सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच कोरोना चाचणी (रॅपिड) पोलीस व आरोग्य विभागाने सुरू केली आहे. याअंतर्गत शुक्रवारी (दि.१४) व शनिवारी (दि.१५) २१६ जणांची कोरोना चाचणी केली असता त्यातून ४१जण बाधित आढळल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी अशोक नागवडे यांनी दिली.
सुपा येथे कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी पोलीस व आरोग्य विभागाने रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी मोहीम सुरू केली आहे. त्यांना मदत करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासकीय यंत्रणाही सरसावली आहे. सुपा-पारनेर रस्ता, बाजारतळ चौक, वाघुंडेकडे जाणारा रस्ता, शहजापूर चौक आदी ठिकाणी विनाकारण फिरणारे, भाजीपाला, फळविक्रेते यांची गर्दी वाढू लागल्याने रस्त्यावरच कोरोना चाचणी केली जात आहे. शुक्रवारी १५२ जणांच्या चाचणीत २१ जण कोरोनाबाधित आढळले. शनिवारी पुन्हा हे पथक रस्त्यावर आले. यावेळी ६४ जणांची तपासणी केली असता त्यात २० जण बाधित आढळले. दोन दिवसात २१६ जणांची तपासणी केली असता त्यात ४१ जण कोरोनाबाधित आढळून आले. यावेळी ८३ नागरिकांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात आले, असे आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी गुंजाळ यांनी सांगितले.
या पुढील काळात नागरिकांनी तरी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश कोल्हे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे हे सहकाऱ्यांच्या मदतीने कोरोना नियंत्रणासाठी स्थानिक यंत्रणेला मदत करत आहेत.
आरोग्य विभागातील आरोग्य सेविका अंजली वर्पे, आरोग्य सहायक जयश्री देतरसे, समुदाय आरोग्याधिकारी डॉ. नीलेश कोल्हे, आरोग्यसेवक विजय भोईर, पर्यवेक्षक संजय साठे, प्रवीण शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी गुंजाळ आदी उपस्थित होते.
---
१५ सुपा
सुपा येथे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी.