नगराध्यक्षा आदिक : वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ अर्थसहाय्य
श्रीरामपूर : पालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या कोरोना उपचार केंद्रासाठी अनेकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी त्यासाठी एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित केले आहे.
पालिकेच्या वतीने नागरिकांसाठी हे केंद्र सुरू करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात होती. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने उभारणीचे नियोजन सुरू केले आहे. साहित्य खरेदीसाठी दानशूरांकडून मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
नगराध्यक्षा आदिक यांनी रुग्णांना आवश्यक सुविधा मिळण्यासाठी दिवंगत गोविंदराव आदिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित केले आहे.
गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी शहरातील २० हजार कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले होते. त्यात गहू, डाळ, तांदूळ, तेल व मसाले यांचा समावेश होता. ३२ नगरसेवकांच्या प्रभागात सर्व गरीब व गरजू घटकांना याचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी योग्य नियोजन करण्यात आले होते. दिव्यांगांनाही मदतीच्या किटचे वाटप केले.
सॅनिटायझर, मास्क व ग्रामीण रुग्णालय, संत लुक हॉस्पिटल, युनिटी हॉस्पिटल येथे वाफ घेण्याचे मशीन दिले. सर्व आशा वर्कर्स यांना पीपीई किट, एन ९५ मास्क दिले होते. कृषक समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आदिक यांनी आयोजन केले होते.
समाजातील इतरही दानशूरांनी पुढे येत पालिकेच्या कोरोना केंद्राला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
-------
ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची भेट
पालिकेच्या कोरोना केंद्रासाठी नगराध्यक्षा आदिक यांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची भेट दिली. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे त्यांनी या मशीन सुपुर्द केल्या. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, रईस जहागीरदार, शिवसेनेचे सचिन बडधे, अल्तमेश पटेल, रवी पाटील, डॉ. सचिन पर्हे, डॉ. संकेत मुंदडा आदी उपस्थित होते.
---------