विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे शुक्रवारी आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी परिसरातील १७६ नागरिकांनी लसीकरण करून घेतले.
सोयीच्या दृष्टीने विसापूर येथे लसीकरण सुरू करावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी होती. परिसरातील उखलगाव, सुरेगाव, मुंगुसगाव, चांभूर्डी, सारोळा सोमवंशी, कोरेगव्हाण या गावांसाठी विसापूर मध्यवर्ती ठिकाण आहे. या गावातील लोकांचा विसापूर येथे दैनंदिन संपर्क असतो. मात्र पिंपळगाव पिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या लोकांना खास लसीकरणासाठी जावे लागत होते. त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. यावेळी सरपंच अरविंद जठार यांनी उपस्थित राहून विसापूर येथे आरोग्य विभागाने लसीकरण घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत गटणे, ग्रामपंचायतीचे सहाय्यक शशिकांत म्हस्के यांनी आरोग्य विभागाला सहकार्य केले. लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी आरोग्य अधिकारी डॉ. जयदेवी राजेकर, बी. बी. गोधडे, प्रशांत सहस्रबुद्धे, संदीप विधाटे, विसापूर उपकेंद्राच्या परिचारिका सुशिला जाधव, कविता गायकवाड, प्रमिला भिंगारदिवे यांनी परिश्रम घेतले.