राज्यात शनिवारपासून (दि.१६) कोरोना लसीकरण होणार असून, यासाठी बुधवारी सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यभर लस पोहोच करण्यात आली. नगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३२ हजार आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असून, बुधवारी ३९ हजार डोस नगरसाठी प्राप्त झाले. जिल्हा परिषदेतील शीत साखळी उपकरणांमध्ये ठेवलेल्या या लसीचे वाटप गुरुवारी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय व मनपाच्या आरोग्य केंद्रांना करण्यात आले. शनिवारी केंद्रीय स्तरावरून औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर देशात एकाच वेळी या लसीकरणास प्रारंभ होणार आहे.
प्रत्येक आरोग्य केंद्रावर दररोज १०० जणांना ही लस दिली जाणार असून, हळूहळू आरोग्य केंद्र व डोसची संख्याही वाढवली जाणार आहे. नगरसाठी प्राप्त झालेल्या ३९ हजार डोसमध्ये ३२ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होऊन ७ हजार डोस उरणार आहेत. त्याबाबत राज्यस्तरावरून पुढील आदेश आल्यानंतर पुढील डोस कोणाला व कधी द्यायचा, हे निश्चित होणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळाली.