श्रीरामपूर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयासह १४ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५०० बेड्स उपलब्ध असले तरी त्यात ऑक्सिजन बेड्सचा मात्र तुटवडा आहे.
अशा संकटकाळात शहरातील रुग्णांना नगर, नाशिक, औरंगाबाद व पुणे येथील रुग्णालयांमध्ये घेऊन जावे लागत आहे, अशी माहिती रुग्णवाहिका चालकांनी लोकमतला दिली.
-----------
औरंगाबादला अधिक फेऱ्या
श्रीरामपूर व नगरमध्ये ऑक्सिजन बेड्स मिळत नाहीत. त्यामुळे औरंगाबाद येथील घाटी व हेडगेवार रुग्णालयांमध्ये रुग्णांना घेऊन जात आहे. मात्र, तेथेही बेड मिळेल याची कोणतीही खात्री नाही. तिथे पोहोचण्यापूर्वीच वजनदार मंडळी बेड्स मिळवतात. त्यामुळे रुग्णांना शहरभर घेऊन फिरावे लागते. त्यामुळे दिवसभरात एक किंवा दोनच फेऱ्या होतात, अशी माहिती शाम हेळकुटे यांनी दिली.
-------------
रुग्णवाहिकेतच रुग्ण अडकतात
संशयितांची एचआरसी चाचणी केल्यानंतर कोरोनाची तीव्रता समजते. त्यानंतर बेड्सची शोधाशोध सुरू होते. ऑक्सिजन किंवा आयसीयू बेड तर मिळतच नाही. तोपर्यंत रुग्ण मात्र रुग्णवाहिकेतच बसून राहतो. मानवतेच्या भूमिकेतून त्यांना गाडीतून उतरून देता येत नाही. मात्र, स्वत: बाधित होण्याची भीती बळावते अशी माहिती चंद्रकांत कदम या चालकाने दिली.
----------
कुटुंबीय काळजीत
रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे कुटुंबीय काळजीत पडतात. संपूर्ण कुटुंब बाधित होण्याची शक्यता असते. त्यामुळे काम बंद करून घरीच थांबण्याचा आग्रह कुटुंबीय धरतात. मात्र, घरी थांबलो तर उपजीविकेचे काय? हा प्रश्न आहे. रात्री-अपरात्री रुग्णाच्या कुटुंबीयांचे रुग्णवाहिकेसाठी फोन येतात. स्थिती हाताबाहेर गेलेली आहे, असा अनुभव या चालकांनी कथन केला.
----------