राशीन : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना कर्जत तालुक्यातील वायसेवाडी गावकऱ्यांनी मात्र योग्य नियोजनातून कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखले आहे. माजी सैनिकांनी गावात जाऊन ग्रामस्थांचे योग्य प्रबोधन केल्यानंतर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून चाचणी करण्यात आल्या. ११५ जणांच्या केलेल्या चाचण्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही.
आरोग्य पथक गावात रॅपिड अँटिजन चाचणी करण्यासाठी दाखल झाले. मात्र, त्यांना पाहून गावकरी शेतावर कामाला निघून गेले. चाचणीसाठी कोणीच पुढे येईना. त्यामुळे ग्रामसेवक गुणवंत शेजाळ आणि आलेले आरोग्य पथक चिंतेत पडले. बराचवेळ झाला तरी एकाही ग्रामस्थाची चाचणी होऊ शकली नव्हती. याची माहिती कर्जत पोलिसांना मदत करत असलेले गावातीलच माजी सैनिक छगन सूळ यांना समजली. त्यांनी शेजाळ यांच्याशी बोलून आम्ही माजी सैनिक काही मदत करू का, अशी विचारणा केली. त्यांनी परवानगी देताच सूळ आणि मिलिंद रेणुके यांनी आपला जुना लष्करी गणवेश परिधान करून गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी गेले. चाचणी करून घेण्यात धोका नाही उलट फायदाच आहे, हे त्यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले त्यानंतर चाचणी करून घेण्यासाठी गावकऱ्यांनी रांग लावली.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तुषार काकडेे, आरोग्य विस्तार अधिकारी मारुती जाधव, आरोग्यसेविका व्ही. एस. गायकवाड, आशासेविका एस. एम. मोरे, एस. बी. सायकर, अंगणवाडी सेविका एस. व्ही. मोरे, धनश्री पवार, मदतनीस एस. डी. शेटे, तारामती कांबळे, सरपंच पल्लवी महारनवर, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष सुरेश कोंडलकर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भिसे, महादेव मोरे, ग्रामसेवक गुणवंत शेजाळ, राजेंद्र महारनवर, सिद्धिविनायक ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील शेटे, कर्मचारी रवींद्र पवळ, महेश कांबळे उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना मास्क व सॅनिटाझरचे वाटप केले. कोरोना चाचणीबद्दल ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर केल्याने ग्रामपंचायतीने माजी सैनिकांचा सन्मान केला.
----
फोटो आहे
वायसेवाडी येथे माजी सैनिकांनी कोरोना चाचणीसाठी आरोग्य विभागाला मदत केली.