अहमदनगर : कोरोना महामारीने अनेक संकटे निर्माण केली. जिल्ह्यातील शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू या महामारीने पुसले गेले. आता ही कुटुंबे सावरण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्यात येत आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यातील अडीच हजारांपेक्षा जास्त पुरुषांना, तर दीड हजारांपेक्षा जास्त महिलांना जीव गमवावा लागला. अडीच हजार मृत्यूंमध्ये घराची जबाबदारी असणाऱ्या कर्त्या पुरुषांची संख्या मोठी होती. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर बहुतांशवेळा कुटुंबाची जबाबदारी ही त्याच्या पत्नीवर येऊन पडते. सध्याच्या परिस्थितीमध्ये तत्काळ नोकरी किंवा कुठला व्यवसाय मिळणे कठीण आहे. या परिस्थितीमध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम या योजनांमध्ये अशा महिलांची नावे घेऊन त्यांना पेन्शन सुरू करण्यात येते.
-----------
असा करा अर्ज
जिल्हा महिला, बालविकास विभागाकडून जिल्ह्यातील अशा कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येत आहे. त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात येणार आहे. महिला बालविकास विभागाचे कर्मचारी, अधिकारी गावोगावी जाऊन याची माहिती घेत आहेत. या योजनेपासून कोणी वंचित राहू नये, या उद्देशाने घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे गेला असल्यास त्याची माहिती महिला बाल विकास विभागाला द्यावी. तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
-----------
जिल्ह्यातील एकूण बाधित :
बरे झालेले रुग्ण :
उपचार सुरू असलेले रुग्ण :
पुरुषांचा मृत्यू- २५०० पेक्षा जास्त
महिलांचा मृत्यू- १५०० पेक्षा जास्त
निराधार महिला- ५०० पेक्षा जास्त
------------
१) कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये ३००० पेक्षा जास्त पुरुष रुग्णांना जीव गमवावा लागला
२) घरातील कर्त्या पुरुषाच्या पाठीमागे राहिलेल्या कुटुंबाला सावरताना महिलांची होरपळ होत आहे
३) अनेक महिलांच्या घरामध्ये सासरे, सासू तसेच लहान मुले देखील असल्याने या महिलांना मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
४) शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या महिलांना आपल्या पायावर उभे राहता येऊ शकते, किमान कुटुंब सावरण्यासाठी कुटुंब आहे, त्यांची भूक भागवण्यासाठी शासनाकडून निधी मिळणार आहे.
--------
कोरोना महामारीमुळे शेकडो महिलांना कुटुंब सावरण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ज्या महिलेचा पती कोरोनामुळे गेला, अशा महिलांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी आदी योजनांच्या माध्यमातून अशा महिलांना मदत देण्यात येत आहे.
- महिला व बालविकास कार्यालय
---------