श्रीगोंदा तालुक्यात शुक्रवारी एकाच दिवशी १३४ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कोरोनावर उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. इंजेक्शन काही मेडिकलमधून काळ्या बाजारात खरेदी करावे लागत आहे. महसूल व आरोग्य यंत्रणेने एकत्र येऊन नगरपालिकेच्या पंतनगर येथील सभागृहात कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु करण्याची तयारी केली आहे.
श्रीगोंदा शनिवार अखेर २८२ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण होते. यामध्ये ग्रामीण रुग्णालयात १६, खासगी रुग्णालयात ९२, शासकीय कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये ५७ तर होम क्वारंटाईन ११७ रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्य़ातून येणारे वेगळेच रुग्ण आहेत. एकच दिवशी १३४ पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये श्रीगोंदा शहर २२, पिंपळगाव पिसा १५, काष्टी ११, लोणी व्यंकनाथ- घुटेवाडी ७, कौठा ६ तर येळपणेत ५ रुग्ण आढळून आले. इतर गावातही कोरोनाचे लोन पोहचले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी केले आहे.
...........
गर्दी करणाऱ्यांवर कारवाई
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शनिवार, रविवारचा लाॅकडाऊन कडक केला. श्रीगोंदा, बेलवंडी पोलिसांनी मोकाट फिरणाऱ्या अगर गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व संपत शिंदे हे वाहनांची तपासणी करीत आहेत.
..............
लग्न, साखरपुडा, जागरण गोंधळ या कार्यक्रमातून कोरोनाचे रुग्ण अधिक निघत आहेत. त्यामुळे कार्यक्रम आयोजकांनी स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जिवाचा विचार करून असे कार्यक्रम काही दिवस स्थगित करावेत. कोरोनाची लाट ओसरली की या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा.
-
प्रदीप पवार, तहसीलदार, श्रीगोंदा