बोटा : मुंबई येथून संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथे आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. येथील एका ३२ वर्षीय युवकाला त्रास जाणवल्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. या युवकाचा मंगळवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती संगमनेरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप व बोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.आतिष कापसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
केळेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी मुंबई घाटकोपर येथून ३२ वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नी व मुलीसह आले. त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. सोमवारी सकाळी या व्यक्तीस सर्दी, ताप, खोकला व घशात खवखव जाणवू लागली. त्यास तपासणीसाठी बोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. अधिक तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवले. या व्यक्तीचे स्वॅबचे नमुने तपासले असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्यांची पत्नी व मुलगी यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.