शिर्डी : एकीकडे कोरोना महामारीने जगासमोर संकट निर्माण केले असले तरी भाविकांचे साईदर्शन मात्र सुकर व आनंददायी केले आहे. कोवीड पूर्वी साईमंदीरातील आराडाओरड, सुरक्षा रक्षकांकडून होणारी धक्काबूक्कीमुळे अनेक भाविकांच्या वाट्याला आनंदाऐवजी मनस्ताप येत होता. मात्र आता हे सर्व बंद झाले आहे.
तासनतास दर्शनरांगे ताटकळणारे व दर्शनानंतर त्रस्त होवून बाहेर पडणारे भाविक हे नित्याचेच चित्र होते. संस्थान व्यवस्थापन व प्रशासनाने प्रयत्न करूनही त्यात काही बदल करता आला नव्हता. संस्थान कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक व्यवसायिकांचे भाविकांशी वागणेही उद्धटपणाचे होते. भाविक मात्र हे सगळे निमुटपणे सहन करत होते. कोवीडच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर १६ नोव्हेंबर रोजी मंदीरे खूली होतानाच नव्या पर्वाचा शुभारंभ झाला. आज समाधी मंदीरात कोणताही आवाज, आराडाओरड, गोंधळ नाही. सुरक्षा रक्षक धक्काबुक्की करत नाहीत. समाधी चौथऱ्यावर गर्दी करत इकडे तिकडे फिरणाने पुजारी नाहीत. पास घेऊन अर्धा-पाऊण तासाच्या रांगेत भाविक चालत थेट मंदिरात जातो. मंदीरात पोहचल्यावर अगदी शांतपणे दर्शन घेतो. पुजारी समाधी चौथऱ्यावर साईसच्चरित्राचे पठण करत असतात. भाविकांच्या दृष्टीने हे सगळ स्वप्नवत व आनंददायी आहे. याप्रकारचे दर्शन वारंवार लाभो अशी मनोकामना भाविक व्यक्त करत आहेत.
...............
भाविकच आपले देव
लॉकडाऊनमध्ये मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीत फिरकले नाहीत. यामुळे शिर्डीतील अनेक व्यवसायिंकावर उपासमारीची वेळ आली. कर्मचाऱ्याचे पगार रखडले. साईबाबांच्या नंतर भाविकच आपल्यासाठी देव असल्याची अनुभूती यातून आली. त्यामुळे भाविकांच्या प्रती व्यवसायिकांची दृष्टी व वागणूक बदलली. प्रशासनानेही ठाम भूमिका घेतली, व्हीआयपींचे लाड कमी झाले. कधी नव्हे ते ग्रामस्तही मंदीर परिसरात नियम पाळू लागले.
दर्शन आनंददायी झाले असले तरी भाविकांच्या तोकड्या संख्येमूळे व्यवसायांनी अद्याप उभारी घेतलेली नाही. हळूहळू पुर्वपदावर येण्यासाठी प्रत्येकजण आतूर आहे.