शिर्डी : सोशल डिस्टन्सींग व फेस मास्कच्या माध्यमातून सुरक्षेची काळजी घेत साईबाबा संस्थानने गुरुवारी (दि.२ एप्रिल) रामजन्मदिनी कोरोना रूपी रावणाला अंगठा दाखविला. जगभरातील करोडो भाविकांना कोरोनापासून काळजी घेण्यासाठी योग्य तो संदेश संस्थानने दिला. भाविकांविना रामजन्म उत्सव साजरा साजरा केला. श्रीरामनवमी साईसंस्थानचा प्रमुख उत्सव असलेल्या रामनवमी उत्सवासाठी शेकडो पालख्यांद्वारे हजारो पदयात्री येत असतात. उत्सवातील लाखो भाविकांची उपस्थिती, साईनामाचा गजर, ढोल-ताशांचे आवाज, फटाक्यांची आतषबाजी, फुले, गुलालाची उधळण, रथ मिरवणुकीत भाविकांच्या उत्साहाला येणारे उधाण, कावडीने गोदाजल आणून साईसमाधीला घालण्यात येणारे स्रान व या सर्व कार्यक्रमातून भाविकांना मिळणारा आनंद कोरोनाने हिरावून घेतला. यंदाचा रामनवमी उत्सव मंदिरातील चार भिंतीच्या आत सुरू आहे. बुधवारी द्वारकामाईतील अखंड पारायणाची गुरुवारी सकाळी सांगता झाली. यानंतर द्वारकामाईतून गुरूस्थानमार्गे समाधी मंदिरात मिरवणूक काढण्यात आली. यात संस्थानचे सीईओ अरूण डोंगरे यांनी विणा, डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे यांनी ग्रंथ तर प्रशासकीय अधिकारी डॉ़आकाश किसवे व अशोक औटी यांनी साईप्रतिमा धरून सहभाग घेतला. यावेळी अंजली डोंगरे, वैशाली ठाकरे, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, संरक्षण अधिकारी मधुकर गंगावणे अनावश्यक उपस्थित होते. डोंगरे दाम्पत्याच्या हस्ते साईसमाधीची पाद्यपूजा करण्यात आली. यानंतर द्वारकामाईतील गव्हाच्या पोत्याचे पूजन करून ते बदलण्यात आले. लेंडी बागेतील शताब्दी ध्वजही बदलण्यात आला. साईबाबांनी १८९७ साली शिर्डीत उरूस सुरू केला. तेव्हापासून द्वारकामाईवर निमोणकर व रासणे परिवाराकडून निशाण लावण्याची व कोंडाजी सुताराच्या वशंजाच्या घरापासून त्याची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. १२३ वर्षांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी निमोणकरांच्या वतीने संस्थानने स्वत:च हे निशाण तयार करवून लावण्याचा निर्णय घेतला. रासणेंनी कालच आपले निशाण पाठवले. उत्सवात मुख्य दिवशी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्याची प्रथाही आज मोडून शेजारतीनंतर मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हुबळी येथील भाविक अंबली यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती.
कोरोनामुळे शिर्डीत भाविकांविना रामजन्मोत्सव साजरा; संस्थानने भाविकांना दिला सुरक्षेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 1:00 PM