अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १७ पैकी १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील कोरोना बाधित आढळलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
याशिवाय कर्जत तालुक्यातील तालुक्यातील राशीन येथे मुलीकडे आलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७२ झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
आज सायंकाळी हे सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये नगर शहरातील रिक्षा चालकाच्या कुटुंबातील तिघेजण बाधित आढळून आले.मूळच्या मुंबईकर येथील 75 वर्षीय वृद्ध महिला राशीन येथे मुलीकडे आल्या होत्या. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज तो अहवाल प्राप्त झाला. त्यात या महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.