अहमदनगर : अहमदनगर येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने आष्टी तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते त्यातील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हा रुग्ण अहमदनगर येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आला होता. आलमगीर येथे या रुग्णाचे नातेवाईक असल्याने तो या भागात येऊन गेला आणि यातूनच या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे येत आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा हे गाव अहमदनगरपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे.
आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता परंतु आता आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे रुग्ण आढळल्याने या गावाच्या परिसरातील तीन किलोमीटरपर्यंतची गावे सील करण्यात आली आहेत. परिसरातल्या गावांत संपूर्ण संचारबंदीचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. रुग्ण आढळलेल्या गावापासून अहमदनगरला जो रस्ता येतो या रस्त्यावर अहमदनगर जिल्ह्यातील चार गावे आहेत. त्यामुळे या गावांतहीे आता भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान हा रुग्ण जरी आष्टी तालुक्यातील असला तरी त्याचे नमुने अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. एकूण चौघांचे नमुने पाठवण्यात आले, त्यातील एक रुग्ण आढळला असून इतरांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान आता या रूग्णाच्या सहवासात आलेल्यांची भीतीने गाळण उडाली आहे.