अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १२ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. हे अहवाल आज प्राप्त झाले. दरम्यान आज पुन्हा ४८ स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात कोपरगाव येथील बाधित महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचेही स्त्राव पाठविण्यात आले आहेत. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
दरम्यान, काल बाधित आढळलेल्या कोपरगाव येथील महिलेला आज बूथ हॉस्पिटलमधून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मुकुंदनगर येथील ७६ वर्षीय बाधित व्यक्तीसही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आले. या व्यक्तींनी प्रकृती विषयी तक्रारी केल्याने त्यांना अधिक तपासणीसाठी इकडे आणण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. इतर २१ रुग्णावर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोना बाधित तीन व्यक्तींना १४ दिवसानंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने घरी सोडण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुरंबीकर यांनी दिली.