अहमदनगर : महापालिकेचे सन २०२१-२२ चे ६८५ कोटींचे अंदाजपत्रक प्रशासनाने गुरुवारी स्थायी समितीला सादर केले. दरम्यान, सभा तहकूब करण्यात आली. ही सभा शुक्रवारी होणार असून, या सभेत अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे.
महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी सन २०२१-२२ चे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. यावेळी सभापती अविनाश घुले, सदस्य प्रकाश भागानगरे, मनोज कोतकर, श्याम नळकांडे, रवींद्र बारस्कर, सुप्रिया जाधव, सोनाबाई तायगा शिंदे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, यशवंत डांगे, मुख्यलेखाधिकारी प्रवीण मानकर, नगरसचिव शहाजन तडवी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदी उपस्थित हाेते. महसूल उत्पन्न ३०५ कोटी ९५ लाख, भांडवली जमा ३३२ कोटी ६३ लाख इतकी अपेक्षित आहे. संकलित करापोटी ४० कोटी ५० लाख येणे अपेक्षित आहे.
शासनाकडून विविध विकास कामांसाठी निधी मिळतो. या निधीमध्ये महापालिकेला हिस्सा भरणे प्रस्तावित आहे. शासनाच्या अमृत योजनेतील पाणी पुरवठा, सौर ऊर्जा प्रकल्प, हरितपट्टा, घनकचरा आदी विविध विकास कामे सुरू आहेत. या योजनांमध्ये महापालिकेचा हिस्सा भरावा लागणार आहे. त्यासाठीही अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.
.....
जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर
चितळे रोडवरील भाजी मार्केट, सावेडी नाट्यगृह यांसह विविध प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे अंदाजपत्रकात म्हटले आहे.
.....
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर
कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. लॉकडाऊनच्या काळात महापालिकेने विविध उपाययोजना राबविल्या. त्या पुन्हा हाती घेण्यास सुरुवात केली असून, कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत अंदाजपत्रकात नमूद आहे.
....
असा आहे ताळेबंद
-सुरुवातीची शिल्लक- ४ कोटी ५८ लाख
-एकूण जमा- ६८० कोटी ३० लाख
- सुरुवातीच्या शिलकीसह ६८४ कोटी ८९ लाख
- एकूण अंदाजित खर्च- ६८१ कोटी ६७ लाख
-अंदाजे शिल्लक-३ कोटी २२ लाख
.....