अहमदनगर : महापालिका स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी मंगळवारी ७०६ कोटी ६५ लाखांचा अर्थसंकल्प महासभेला सादर केला. दरम्यान, सभा तहकूब करून आज, बुधवारी दुपारी एक वाजता अर्थसंकल्पीय सभा होणार आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा झाली. या सभेत स्थायी समितीच्या शिफारशीसह अर्थसंकल्प महापौरांकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी उपमहापौर मालन ढो, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, यशवंत डांगे, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, आदी उपस्थित होते. प्रशासनाने ६८५ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. स्थायी समितीत चर्चा होऊन मूळ अंदाजपत्रकात वाढ करण्यात आली आहे. सभापती अविनाश घुले यांच्या रूपाने राष्ट्रवादीने सत्तेत सहभाग घेतला. सभापती घुले यांचा त्यांच्या कार्यकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्यांनी अनेक प्रकल्पांचा समावेश करत ते पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर प्रकाश टाकला आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन घरांना घरपट्टी व पाणीपट्टी लागू करणे, नावनोंदणी न झालेल्या मालमत्तांना घरपट्टी अकारणे, रस्त्यांच्या बाजूला उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडला घरपट्टी आकारणे, वाहनतळ उभारणे यांसह मालमत्तांचा शोध घेऊन त्या भाडेतत्त्वावर देण्याबाबतची कार्यवाही करण्याचीही शिफारस स्थायी समितीने केली आहे. याशिवाय फेज-२ पाणी योजनेचे काम पूर्ण करून नगरकरांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच अमृत भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे घुले यांनी म्हटले आहे. स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महापौर बाबासाहेब वाकळे हे काय भर घालतात, नवीन कोणत्या प्रकल्पांची घोषणा करतात, याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.
....
स्थायी समितीने केलेली शिफारस
चितळे रोड येथे व्यापारी संकुल उभारणे
- प्रोफेसर चौकात मॉल उभारणे
- सावेडी गावठाण येथे व्यापारी संकुल उभारणे
- गजबाजार येथे सराफ बाजार उभारणे
- एप्रिल अखेरपर्यंत फेज-२ योजना पूर्ण करणे
- महापालिकेची रक्तपेढी तातडीने सुरू करणे
- सावेडी येथे अद्ययावत रुग्णालये उभारणे.
- महापुरुषांचे पुतळे बसविण्याची कार्यवाही करणार
- केडगाव येथे खेळाचे मैदान विकसित करणार
पिंपळगाव माळवी येथे चित्रपटनगरी उभारणार
- शहरातील चौकांचे सुशोभीकरण करणार
महामार्गांना पर्यायी रस्ते तयार करणार
........
पदाधिकाऱ्यांना भरघोस निधी
महापौर-२ कोटी, उपमहापौर- ५० लाख, स्थायी समिती सभापती- ५० लाख, सभागृह नेता- ५० लाख, विरोधी पक्षनेता- २५ लाख, महिला व बालकल्याण सभापती- १५ लाख, उपसभापती- १० लाख.
....
शासनाच्या अमृत भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, सावेडी नाट्यगृहाचेही काम सुरू आहे. तसेच सावेडी उपनगरातील तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबाग महाल रस्ता मॉडेल रस्ता तयार करण्यात येईल. याशिवाय शहरात विविध नवीन प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण करण्यात येतील.
- अविनाश घुले, सभापती, स्थायी समिती