अहमदनगर : ठेकेदाराची मुदत संपण्याआधीच नव्याने ठेकेदार नियुक्त करण्यासाठी निविदा मागविण्यात येतात. मात्र महापालिकेने बायाेगॅस प्रकल्प चालवत असलेल्या ठेकेदाराला अभय दिले असून, दोन महिने उलटूनही निविदा प्रसिद्ध केली गेली नाही. त्यामुळे या ठेकेदाराला मनपातील कुठल्या अधिकाऱ्याचे अभय आहे, याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापालिकेने शहरातील व्हेज व नॉनव्हेज वेस्ट मटेरिअलवर प्रक्रिया करण्यासाठी बायोगॅस प्रकल्प उभारला आहे. सुमारे तीन कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प ठेकेदाराला चालविण्यास देण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराची मुदत ३१ जुलै रोजी संपली. वास्तविक पाहता मुदत संपण्याच्या एक महिना आधीच नव्याने ठेकेदार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करणे बंधनकारक होते. परंतु, महापालिकेच्या स्वच्छता विभागाने अद्याप नव्याने ठेकेदार नियुक्त करण्यासाठी निविदा मागविलेल्या नाहीत. महापालिका दर महा प्रकल्प चालक संस्थेस २ लाख ६० रुपये अदा करत आहे. पूर्वीच्याच ठेकेदाराला मुदतवाढ देऊन हा प्रकल्प चालविला जात आहे. इतर प्रकल्प चालकांची मुदत संपल्याने निविदा मागविल्या गेल्या. परंतु, बायोगॅस प्रकल्पासाठी नव्याने निविदाच मागविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे ठेकेदाराचेही फावले असून, नव्याने निविदा न मागविण्यामागे नेमकं काय कारण आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. महापालिकेने ठेकेदाराला एकप्रकारे अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
....
मुदतवाढीत अधिकाऱ्यांना रस
मुदत संपल्यानंतर नव्याने ठेकेदार संस्था नियुक्त करण्यासाठी वेळेत निविदा मागविल्या जात नाहीत, असा इतर प्रकल्पांचा अनुभव आहे. महापालिकेत कुठल्याच प्रकल्पाची निविदा मुदतीत प्रसिद्ध केली जात नाही. विशेष करून स्वच्छता विभागातच असे प्रकार वारंवार घडत असून, याकडे महापालिका आयुक्तांचेही दुर्लक्ष होत आहे.