अहमदनगर : केंद्र सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला सात कोटींचा निधी मंजूर केला. मात्र हा प्रकल्प वर्षे उलटूनही पूर्ण होऊ शकलेला नाही. काम सुरू होण्याआधीच सल्लगार संस्थेला तीन कोटींचा निधी वितरीत केला गेला आहे. पण, या संस्थेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने अजून कामाला सुरुवात न केल्याने सौर ऊर्जा प्रकल्पाला मुहूर्त कधी लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
केंद्रात भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. अहमदनगर महापालिकेत भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर आहेत. उपमहापौर पदही भाजपकडेच आहे. असे असले तरी केंद्र सरकारच्या योजना पूर्णत्वास नेण्यात अहमदनगर महापालिका मागे असल्याचे प्रकल्पांच्या प्रगती अहवालावरून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने अमृत योजनेंतर्गत १ हजार ६५० किलो मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर केला. हा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून ८ कोटी ६३ लाख महापालिकेला प्राप्त झाले आहेत. प्रकल्प व्यवस्थापन सल्लगार संस्था म्हणून केंद्र सरकारने पुणे येथील मेडा संस्थेची नेमणूक केलेली आहे. या संस्थेमार्फत मार्च २०२० मध्ये ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला गेला. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२१ इतकी होती. मुदतीत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. कारण या प्रकल्पासाठी बांधकाम करावे लागणार नाही. जागा शोधून सौर पॅनल उभे करायचे होते. परंतु, वर्षे उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. जानेवारी संपला. फेब्रुवारी महिनाही संपल्यात जमा आहे. मात्र, मुदतवाढ मिळाली किंवा नाही, याबाबत महापालिका अनिभज्ञ आहे. मेडा संस्थेकडूनच मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.
....
असा आहे प्रकल्प
१६५० किलो वॅटचा प्रकल्प
विळद पंपिंग स्टेशन-९९० किलो वॅट
नागापूर-२४०
वसंतटेकडी-२००
आरटीओ पाण्याची टाकी-४५
मुळानगर-६०
जिल्हा परिषद वसाहत-४०
आगरकरमळा-३०
केडगाव औद्योगिक वसाहत-३०
फुलसौंदर मळा-५
केडगाव औद्योगिक वसाहत-१०
......
वर्षाकाठी २ कोटी ४ लाखांची बचत
सौर ऊर्जा प्रकल्पातून दररोज १ हजार ६५० किलो वॅट वीज तयार होईल. ही वीज महावितरणाला देण्यात येणार असून, त्यामुळे महापालिकेची वर्षाकाठी २ कोटी ४ लाखांची बचत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.