अहमदनगर: काेरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना आहे. मात्र घरात दुसरे कुणी कमावते नाही. त्यामुळे अशा परिस्थितीतही नाईलाजाने भाजीपाला, अंडी विकण्याचा व्यवसाय काही वृध्द करत आहेत, अशा वयोवृध्दांना महापालिकेच्या दक्षता पथकाने पुढाकार घेऊन दानशुरांच्या सहकार्याने किराणा किटचे वाटप केले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने शहरात कठोर निर्बंध लागू केले. त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी दक्षता पथक नेमले. उद्यान विभागाचे शशिकांत नजान हे या पथकाचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रस्त्यावर भाजीपाला, फळे, अंडी विकणाऱ्यांवर कारवाई केली. पण काहीजण सांगून ऐकत नव्हते. त्यापैकी काहीजण वयोवृध्द होते. त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पथकाने केला. त्यांच्याशी संपर्क साधला असता वयोवृध्दांनी त्यांच्या व्यथा पथकासमोर मांडल्या. घरात दुसरे कुणी कमावते नाही. हा व्यवसाय बंद झाला तर आम्ही खायचे काय, असा त्यांचा प्रश्न होता. दक्षता पथकाचे प्रमुख नजान यांनी त्यांना धीर दिला. त्यांच्या अडचणी समजून घेत तुम्हाला किराणा देऊ, पण तुम्ही काही दिवस हा व्यवसाय बंद ठेवा, असे सांगितले. त्यावर वयोवृध्दांनीही व्यवसाय बंद ठेवण्याची कबुली दिली. नजान यांनी याबाबत स्नेहबंध ८५ या ग्रुपचे सदस्य श्रेणिक शिंगवी यांच्याशी संपर्क साधला. शिंगवी यांच्यासह सदस्यांनी त्यांनी किराणा देण्याची तयारी दर्शविली. कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासात दक्षता पथकाने दानशुरांचा शोध घेऊन गरजूंना मदत मिळवून दिली. यावेळी ग्रुपचे सदस्य किरण निकम,प्रवीण मुनोत, नूतन फिरोदिया, मनीष मुथा, शिल्पा रसाळ, अभय शेटे, राजेंद्र लोणकर, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.