श्रीगोंदा : नगराध्यक्ष आमच्यापैकी कुणालाही करा, परंतु तुम्ही एकत्र राहा, यामध्ये संघटना, नेते, कार्यकर्ते यांचे हित दडलेले आहे, अशी आग्रही भूमिका दोन्ही काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी मांडली आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात नवीन नगराध्यक्षाची निवड होणार आहे. नागवडे साखर कारखान्यावर शुक्रवारी आयोजित बैठकीत कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्याशी नागवडे, जगताप गटाच्या मनोमिलनावर चर्चा झाली. यावेळच्या चर्चेत सर्वश्री उपनगराध्यक्ष अख्तारभाई शेख, भारत नाहाटा, बापुराव सिदनकर, फक्कड मोटे, अशोक आळेकर, दादा औटी यांनी भाग घेतला. भारत नाहाटा म्हणाले, आमच्या आठ जणांपैकी कोणालाही नगराध्यक्ष करा, आम्ही एकत्र राहू परंतु तालुका आणि नगरपालिकेच्या राजकारणात दोन्ही गटांनी एकत्रित भूमिका कायम ठेवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. राजेंद्र नागवडे म्हणाले, आमच्यात कोणतेही वाद नाहीत. नगरपालिकेत तुम्ही सर्वजण एकत्र राहणार असाल तर मी सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तयार आहे. काँग्रेसच्या दोन नगरसेविका पतीसोबत नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सहलीवर गेल्या आहेत. या सहलीला भाजपा कनेक्शन असल्याची चर्चा आहे. काँग्रेसमधील दोन नगरसेविकांचे गेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी वाद झाला होता. आता या नगरसेविका पतीसोबत थेट परदेशात सहलीवर गेल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
नगरसेवकांची एकीसाठी शिष्टाई
By admin | Published: July 11, 2016 12:37 AM