रियाज सय्यदशिर्डी : केंद्र सरकारने ‘आधार’ कार्ड दुरूस्तीसाठी सेतूसह विविध शासकीय कार्यालयांमध्ये ‘आॅनलाईन’ सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र भारत संचार निगम लिमिटेडच्या शिर्डी कार्यालयात चक्क ‘मोबाईल सीम कार्ड’ विकत घेतल्याशिवाय ‘आधार’ दुरूस्ती करून दिली जात नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.केंद्र सरकारने प्रत्येक भारतीयास स्वत:ची ओळख म्हणून ‘आधार’ कार्ड काढण्यास भाग पाडले. सरकारचा आदेश शिरसंवाद्य मानून प्रत्येकाने ‘आधार’ कार्ड काढून घेतले. पण, ‘आधार’ कार्ड काढताना अनेक चुका झाल्या. अनेकांची नावे चुकली, जन्मतारखा अपूर्ण राहिल्या. मोबाईल क्रमांक गायब झाले, पत्ते बदलले. पुढे मोदी सरकारने ‘डिजीटल इंडिया’च्या नावाखाली सर्वच क्षेत्रात ‘आॅनलाईन’ प्रक्रिया राबविली. त्यास ‘आधार’ ने जोडल्यामुळे ठिकठिकाणी गरज पडू लागली. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रात ‘आधार’ची सक्ती झाली. परंतू ‘आधार’ मधील छोट्या-मोठ्या चुकांपायी सर्वसामान्यांची कामे अडू लागली म्हणून सरकारने सेतू सुविधा केंद्रांसह राष्टÑीयकृत बँका, दूरसंचार, टपाल कार्यालयांमध्ये ‘आधार’ दुरूस्ती केंद्र सुरू केले. शिर्डी दूरसंचार कार्यालयातील ग्राहक सेवा केंद्रातही ६ महिन्यांपूर्वी ‘आधार’ दुरूस्ती सुरू झाली. मात्र ‘बीएसएनएल’चे मोबाईल दुरुस्तीसाठी एका ग्राहकास किमान ७० रूपये खर्च येत आहे.‘आधार’ कार्ड अपडेटच्या मोबदल्यात ग्राहकांना बीएसएनएलचे ‘सीम कार्ड’ देण्याचे आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत. त्यांनी ’टार्गेट’ ठरवून दिल्याने ‘सीम कार्ड’चे वाटप केले जात आहे. या ग्राहक केंद्रात दररोज किमान २० ग्राहक ‘आधार’ दुरूस्तीसाठी येतात. गत सहा महिन्यांपासून ‘आधार’ दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे कार्यालयीन अधीक्षक एम.आर.पवार यांनी सांगितले.
‘सीम कार्ड’घ्या, मगच ‘आधार’ दुरूस्त करा : शिर्डी दूरसंचारचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:50 PM