चंद्रकांत गजाबा बनसोडे (५६) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असणारा त्याचा साथीदार खासगी सहायक अमित सर्जेराव शिर्के (वय ४०, रा. चांदा खुर्द, ता. कर्जत) हा फरार आहे. गुरव पिंपरी येथील शेतकऱ्याने त्यांच्या भावाच्या शेतीचे वाटणीपत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करण्यासाठी गुरव पिंपरी येथील तलाठ्याकडे अर्ज केला होता. ही नोंद करण्याच्या बदल्यात तलाठी बनसोडे व त्याच्या सहायकाने शेतकऱ्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे शेतकऱ्याने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, १० जून रोजी मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रक्कम स्वीकारण्याची तयारी तलाठ्याने दर्शवली. त्यानुसार पथकाने सापळा लावून तलाठी बनसोडे यास १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तलाठ्याचा खासगी सहायक मात्र अद्याप फरार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपअधीक्षक हरीश खेडकर, निरीक्षक दीपक करांडे, निरीक्षक श्याम पवरे, नाईक रमेश चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, हरूण शेख, राहुल सपट आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
लाचखोर तलाठी रंगेहात जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:15 AM