अकोले (जि. अहमदनगर) : तालुका एज्युकेशन सोसायटी पब्लिक ट्रस्ट ही खाजगी मालकीची होऊ नये, संस्थेत घुसलेली घराणेशाही, नोकरभरतीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी, संस्था राजकारणाचा अड्डा होऊ नये म्हणून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव समितीने गुरूवारी अकोले काॅलेज समोर धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सहभाग घेतला. संस्थेचे प्रमुख विश्वस्त चर्चेसाठी येईपर्यंत मंडपातच ठिय्या देण्याचा निर्धार आमदार लहामटे यांनी घेतला आहे.
अकोले बस स्थानक येथून घोषणा देत बचाव समितीचा मोर्चा काॅलेज गेटवर धडकला. तेथे कापडी मंडपात धरणे आंदोलन सुरू झाले. भाषणे सुरू असताना दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख. खजिनदार धनंजय संत, रमेश जगताप, सुधाकर आरोटे, शरद देशमुख, डॉ. दामोदर सहाणे हे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आले. सध्या कार्यकारिणीत असलेले जेष्ठ नेते अशोक भांगरे यांनी कार्यकारिणीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले तर उपाध्यक्ष विठ्ठल चासकर थेट आंदोलकांसमवेत बसले.
आंदोलक व निवेदन स्वीकारण्यास आलेले विश्वस्त यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. कार्यकारी व कायम विश्वस्तांशी चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला. प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी एज्युकेशन सोसायटी पदाधिकारी व आंदोलक यांचे समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. नायब तहसीलदार ठकाजी महाले यांनी प्रशासकीय पातळीवरील निवेदन स्विकारले, मात्र आमदार लहामटे यांनी मंडपातच ठिय्या दिला.
यावेळी तालुक्याच्या मालकीची शिक्षण संस्था वाचविण्यासाठी सजग नागरिकांनी २ मे च्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार लहामटे यांनी केले. शेतकरी नेते दशरथ सावंत, राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे, काॅम्रेड डॉ.अजित नवले, काँग्रेसचे मिनानाथ पांडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते विजय वाकचौरे, राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत, वकील किसन हांडे, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, यमाजी लहामटे, बी.जे.देशमुख, सुरेश नवले, भानुदास तिकांडे, हेरंब कुलकर्णी, शांताराम गजे, सुरेश खांडगे, राजेंद्र कुमकर, चंद्रकांत सरोदे, विकास वाकचौरे, गणेश कानवडे, नामदेव भांगरे, सदाशिव साबळे, तुळशीराम कातोरे, पोपट दराडे, मारूती मेंगाळ, संतोष नाईकवाडी, दिलीप शेणकर, शांताराम संगारे, माधव तिटमे उपस्थित होते.
आमदार लहामटे मंडपातच-
प्रमुख विश्वस्त चर्चेस येत नाही तोपर्यंत धरणे व ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे. ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलक व मी आंदोलन मंडप सोडणार नाही, असे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी जाहीर केले. विश्वस्त चर्चेस न आल्यास सोमवारी (दि. २ मे) एज्युकेशन सोसायटी कार्यालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आमदार डॉ. लहामटे यांनी दिला.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत सुरू असलेल्या प्रशासकीय अनागोंदी कारभाराविरोधात व शिक्षण संस्थेत शिक्षक नोकर भरतीच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असेल तर तो रोखण्यासाठी जनआंदोलन सुरू आहे. जनक्षोभ लक्षात घेवून प्रथम सर्व विश्वस्त व कार्यकारिणीने राजीनामे द्यावेत. नंतर चर्चा करावी, असे आवाहन शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केले.