बोटा : डेहराडून येथील राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या निर्देशानुसार बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या प्रगणनेस शनिवारपासून सुरूवात झाली.संगमनेर तालुक्यातील घारगाव वनपरिमंडलातील वनपरिक्षेत्रात ही प्रगणना सुरू झाली आहे. जंगलातील प्राण्यांची संख्या प्रकारानुसार समजण्यासाठी दरवर्षी मे महिन्यातील बौद्ध पौर्णिमेला वन विभागाच्या माध्यमातून ठराविक पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची गणना केली जाते. तर डेहराडूनच्या राष्ट्रीय संवर्धन प्राधिकरणाच्या वतीने चार वर्षांतून एकदा वन विभाग परिक्षेत्रासह बाहेरही फिरून तसेच ट्रान्झॅक्ट लाईन टाकून बिबट्या व अन्य वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाते.घारगाव वनपरिमंडल असलेल्या घारगाव, नांदूर खंदरमाळ, वनकुटे, बोटा व आंबिखालसा या बीटमधील पंधरा गावांमध्ये साडेसात हजार हेक्टर क्षेत्रफळावर वन विभागाचे कार्यक्षेत्र आहे. या बीटमधील कार्यक्षेत्रात व बाहेरही व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व सुचनेप्रमाणे वनरक्षक व त्यांचे सहकारी सूर्योदयापासून तीन तास फिरून मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती संकलन करीत आहेत. वन्यजीवांच्या पाऊलखुणा, विष्ठा आदींचे छायाचित्रे घेत आहेत. तर ट्रान्झॅक्ट लाईन टाकून मांसभक्षक व तृणभक्षक या सर्वच प्राण्यांची गणना होत आहे. या प्रगणनेमुळे पठारभागातील बिबट्यांसह इतर प्राण्यांची नेमकी आकडेवारी कळण्यास मदत होणार आहे.
घारगाव परिमंडलात बिबट्यांसह वन्यप्राण्यांची प्रगणना सुरू; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:14 PM