मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरमहाराष्ट्र हे मद्यराष्ट्र होत असल्याची टीका होत असतानाच महाराष्ट्र आता तंबाखूच्या पिचकारीच्या देशा होऊ लागला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांमध्ये तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थ चघळल्यामुळे थुंकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया २००९-१० च्या सर्वेक्षणानुसार देशातील २५.९ टक्के नागरिक (३२.९ टक्के पुरूष व १८.४ टक्के स्त्रिया) धूररहीत तंबाखूचे सेवन करतात. महाराष्ट्रातील धूररहीत तंबाखूचे सेवन करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण २७.० टक्के (३५.३ टक्के पुरूष व १८.९ टक्के स्त्रिया) आहे. तंबाखूजन्य पदार्थ अथवा पान चघळून थुंकल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी भिंती लाल होऊन सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होत आहेत़ विद्रुप झालेल्या भिंती पुन्हा पुन्हा रंगवण्यासाठी जनतेने कर रूपाने दिलेला पैसा खर्च करावा लागतो.सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर, थुंकण्यावर कायद्याने प्रतिबंध असला तरी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे व धुम्रपान करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही. थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होऊन आरोग्यास धोका निर्माण होतो. क्षयरोग, स्वाईन फ्ल्यू, न्युमोनिया यासारख्या आजारांचा फैलाव थुंकीमार्फत होतो.केंद्र सरकारच्या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम २०१२ च्या वार्षिक अहवालानुसार, देशातील ३ दशलक्ष लोक व त्यापैकी महाराष्ट्रातील ७५३१९ लोक क्षयरोगाने पिडीत आहेत.क्षयरोगामुळे भारतातील ३ लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यात महाराष्ट्रातील ६६९२ मृतांचा समावेश आहे. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११६ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर व धुम्रपानावर प्रतिबंध आहे. केंद्र सरकारच्या सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध, व्यापारी विनियमन व वाणिज्य उत्पादन, पुरवठा व वितरण) कायदा, २००३ च्या कलम ४ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर प्रतिबंध करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांच्या १८ जुलै २०१३ च्या अधिसूचनेनुसार लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी स्वादिष्ट, सुगंधीत तंबाखू अथवा सुपारीची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.राज्यात ३१.४ टक्के मृत्यूतंबाखू सेवन करून थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होतेच, पण त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन कर्करोग, श्वसनाचे आजार, पुनरूत्पादन संस्थेचे आजार, पचन संस्थेचे आजार यासारख्या प्राणघातक आजारांची लागण होते. दरवर्षी जगातील सुमारे ६० दशलक्ष लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होत आहे. सन २०१० च्या पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रातील सुमारे ३१.४ टक्के लोकांचा मृत्यू तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे पसरणारे आजार व होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी लक्षात घेऊन मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ११६ ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व आरोग्य विभागाच्या कार्यालयांमध्ये थुंकण्यास, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व कार्यालयप्रमुख व सर्व आरोग्य संस्थांच्या प्रमुखांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन मनाईचे फलक दर्शनी भागात लावावेत.-सुजाता सौनिक,प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग
महाराष्ट्र देशा, पिचकारीच्या देशा
By admin | Published: August 30, 2014 11:18 PM