श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून ९ मेपासून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनास पुढील आदेश निघेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबतची पुढील सुनावणी न्यायालयाने १२ मे रोजी ठेवली आहे. यामुळे कुकडीचे शेतीसाठी सोडण्यात येणारे आवर्तन बारगळण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.
पिंपळगाव जोगे धरण लाभक्षेत्रातील प्रशांत औटी या शेतकऱ्याने पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकमधील (मृतसाठा) पाणी शेतीसाठी सोडण्यात येत आहे. कालवा सल्लागार समितीचा हा निर्णय बेकायदा आहे. तरी कुकडीच्या येडगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनास प्रतिबंध करावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कुकडीचे येडगाव धरणातून पाणी सोडू नये, असा आदेश दिला. त्यावर जलसंपदा विभागाने पिंपळगाव जोगे धरणातून येडगाव धरणात, तसेच डिंबे धरणातून येडगाव धरणात सोडण्यात येणारे पाणी बंद केले आहे.
---
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पुणेकरांनी डिंभे, पिंपळगाव जोगे आणि वडज धरणाची शेतीसाठी आवर्तन करून घेतले. आपली पोळी भाजताच न्यायालयात धाव घेतली. कुकडीचे नगर, सोलापूर जिल्ह्यांसाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनात खोडा घातला आहे. नगर, सोलापूर जिल्ह्यांतील शेती उद्ध्वस्त करण्यासाठी हे राजकारण आहे. या विरोधात लढावे लागेल.
-मारुती भापकर,
सामाजिक कार्यकर्ते, खरातवाडी, श्रीगोंदा
---
कुकडीचे येडगाव धरणातून आवर्तन ९ मेपासून सोडण्यासाठी पिंपळगाव जोगे व डिंभे धरणातून येडगावमध्ये पाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत कुकडीचे आवर्तन सोडण्यास स्थगिती दिली. १२ मे रोजी सुनावणी झाल्यानंतर आवर्तनाबाबतचा निर्णय होईल.
- हेमंत धुमाळ,
अधीक्षक अभियंता, कुकडी प्रकल्प
---
...तरच मिळू शकते आवर्तन
कोणत्याही धरणातील डेड स्टाॅकमधील पाणी शेती सिंचनासाठी वापरता येता येत नाही. याचा धागा पकडून प्रशांत औटी यांच्या याचिकेवर न्यायालयाने कुकडीचे आवर्तन सोडण्याबाबत स्थगिती दिली. आता शासनाला डेड स्टाॅकचे पाणी पिण्याच्या वापरासाठी सोडायचे आहे, असे म्हणत त्यासाठी नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे पिण्याच्या पाणीटंचाईचे अहवाल द्यावे लागतील. त्यावर मुख्यमंत्र्यांचे मंजुरीपत्र जलसंपदा विभागास न्यायालयास सादर करावे लागेल, तरच कुकडीचे येडगाव धरणातून आवर्तन मिळू शकते.