अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील आरोपींना आज शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेचा निकाल ऐकण्यासाठी कोपर्डीचे सर्व ग्रामस्थ आज (शनिवारी, दि. १८) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात एकवटले आहेत. त्यामुळे कोपर्डी गाव सुनसान झाले आहे.कोपर्डी घटनेला सव्वा वर्षाचा काळ लोटला आहे. दरम्यान विविध साक्षीपुरावे, युक्तीवाद होऊन आता जिल्हा न्यायालयात या खटल्यातील आरोपींवर दोष सिद्ध होणार आहे. त्यानंतर कदाचित निकालही लागू शकतो, या अपेक्षेने जिल्हा न्यायालयात मोठी गर्दी झाली आहे. कोपर्डीकर ग्रामस्थही जिल्हा न्यायालयाच्या आवारात दाखल झाले आहेत. न्यायालयाच्या आवारात ध्वनीक्षेपक लावण्यात आला असून, तेथे सुनावणी ऐकण्यास मिळेल, या अपेक्षेने कोपर्डीकर ग्रामस्थ न्यायालयाच्या आवारात दाखल झाले आहेत. पीडित मुलीचे आई, वडीलही न्यायालयात दाखल झाले आहेत.कोपर्डीत एकदम शांतता असली तरी निकालानंतर काही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कोपर्डीतही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोपर्डीत १ पोलीस उपअधीक्षक, ४ पोलीस निरीक्षक, ६३ कॉन्स्टेबल, आणि स्ट्रायकिंग फोर्सच्या २ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.पीडित मुलीच्या घराला, आरोपींच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. तसेच गावातही ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे.
अख्खं गाव निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात; कोपर्डी सुनसान; मोठा फौजफाटा तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:13 AM