श्रीरामपूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठानेकामगार न्यायालयाच्या आदेशानुसार २८३ कामगारांची ९२ लाख ५४ हजार रुपये रक्कम नगर न्यायालयात जमा केल्याची माहिती शेतमजूर युनियनचे सरचिटणीस बाळासाहेब सुरुडे यांनी दिली.
रोजंदारी कर्मचा-यांची १ एप्रिल २००१ पासून सक्तीने कपात करण्यात आली होती. त्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली होती. मात्र उपदान कायदा १९७२ नुसार कामगारांना उपदानाचे (ग्रॅच्युईटी) पैैसे देणे आवश्यक असताना विद्यापीठाने ते अदा केले नाही. कामगारांनी त्याविरोधात नगर येथील कामगार न्यायालयात अर्ज दाखल केले होते. याआधी सुमारे ९०० कामगारांनी न्यायालयाकडून ग्रॅच्युईटीची रक्कम प्राप्त करून घेतलेली आहे.
सन २०१७ ते २०१९ मध्ये ३१२ कामगारांनी या रकमेकरिता न्यायालयात अर्ज दाखल केले होते. न्यायालयाने प्रत्येक अर्जदार कामगाराची रक्कम निश्चित करून ती अदा करण्यााचे आदेश करून त्यावर दहा टक्के व्याज देण्याचे आदेश दिले.
निर्णयाच्या अंमलबजावणी कामी विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. दिलीप पवार, नियंत्रक विजय कोते, कामगार कल्याण अधिकारी अविनाश तांबे, संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब सुरुडे, अध्यक्ष गुजाबा लकडे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक झाली.