श्रीरामपूर : नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील गाड्यांची संख्या आता बऱ्यापैकी वाढली आहे. सर्वच राज्यांनी प्रत्येक प्रवाशाला राज्यात प्रवेश करताना ४८ तासांच्या आतील कोविड निगेटिव्ह चाचणी अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी ही खबरदारी बाळगावी लागणार आहे.
जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या उत्तर भारत व दक्षिण भारताला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या जातात. त्याचबरोबर शिर्डी येथूनही काही विशेष गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. नगर शहरातून दररोज २५० प्रवासी रेल्वेने प्रवास करत आहेत. लॉकडाऊनपूर्वी मात्र हीच संख्या एक हजारांच्या वर होती.
कोविड नियमावलींमध्ये जवळपास सर्वच राज्यांनी रेल्वे प्रवासासाठी चाचण्यांची सक्ती केलेली आहे. रेल्वे स्थानकांवर त्याकरिता कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तेथे प्रत्येकाच्या तापमानाची तपासणी केली जात आहे.
---------
असे आहेत रेल्वेचे नियम
४८ तासांच्या आतील कोविड चाचणी अहवाल.
आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा लागेल.
रेल्वेअंतर्गत केटरिंग सुविधा तात्पुरती बंद.
झोपण्यासाठी कपडे दिले जाणार नाहीत.
--------
जिल्ह्यातून धावणाऱ्या प्रमुख गाड्या
गोवा एक्स्प्रेस
कर्नाटक एक्स्प्रेस
झेलम एक्स्प्रेस
पुणे पाटणा एक्स्प्रेस
आझाद हिंद एक्स्प्रेस
पुणे नागपूर एक्स्प्रेस
शिर्डी दादर एक्स्प्रेस
-----------
मुंबई प्रवास सोपा
शिर्डी येथील साईनगर स्थानकावरून सुटणारी व पुणे आणि नाशिकमार्गे मुंबईला जाणारी दादर एक्स्प्रेस आता पूर्ववत सुरू झाली आहे. या दोन्ही गाड्यांना आता प्रवाशांची पसंती मिळत आहे. व्यापारी वर्गाला ही गाडी लाभदायी ठरलेली आहे.
-----------
प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या दौंड ते भुसावळ या रेल्वेगाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. चांगला प्रतिसाद मिळाल्यास गाडी नियमित सुरू होऊ शकेल.
-रणजित श्रीगोड, नेते, प्रवासी संघटना.
-------