ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव उपकेंद्रामध्ये कोरोना लसीकरण सुरू करावे, असे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी ढवळगाव उपकेंद्रात लसीकरण सुरू केले आहे. या लसीकरणास ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ढवळगावचे सरपंच सारिका रवींद्र शिंदे व माजी सरपंच विजय शिंदे यांनी तालुका आरोग्य अधिकारी व पिंपळगाव पिसा आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिंदे यांचा पाठपुरावा व लोकमतमधील वृत्तांकन यामुळे ढवळगाव उपकेंद्रात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. येथे लसीकरण नसल्यामुळे येवती, ढवळगाव येथील ज्येष्ठांना पिंपळगाव पिसा येथे जावे लागत होते. मात्र, एसटीची सुविधा नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब शिंदे यांनी आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ढवळगाव येथे लसीकरणास प्रारंभ झाला. उपकेंद्रात जागा कमी असल्यामुळे शाळेचे तीन वर्ग उपलब्ध करण्यात आले. एका ठिकाणी नोंदणी, दुसऱ्या ठिकाणी लसीकरण तर तिसऱ्या वर्गात लस दिल्यानंतर नागरिकांना बसण्यासाठी वर्ग खोल्या उपलब्ध असल्यामुळे गर्दी होत नाही.
लसीकरणादरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, तालुका आरोग्य साहाय्यक बाबासाहेब पंडित यांनी भेट दिली. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. तब्बसुम पठाण, पर्यवेक्षक डी.बी. गोधडे, पी.एल. सहस्रबुद्धे,
ढवळगाव उपकेंद्रातील आरोग्य सेविका एम.आर. मापारी, एस.आर. चव्हाण, आरोग्य सेवक एस.बी. गायकवाड, मदतनीस संगीता खुपटे, आशा कर्मचारी दीपाली शिंदे, वैजयंता गायकवाड, ग्रा.पं. कर्मचारी सुनील शिदे, सोन्याबापू बोरगे, उपसरपंच गणेश ढवळे, रवींद्र शिंदे, विजय शिंदे, बाबासाहेब शिंदे, गौतम वाळुंज, कैलास ढवळे, रामचंद्र लोंढे, गवराम आढाव, सुजाता रासकर, ग्रामसेविका सरला महाडिक आदी उपस्थित होते.