जामखेड : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती. यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त होते, तसेच ऑक्सिजनची कमतरता, रुग्णांना बेड उपलब्ध होईल की नाही, अशी स्थिती होती. अशा परिस्थितीत मेडिकल शिक्षण घेत असलेली युवती स्नेहा सूर्यकांत मोरे हिने कोणताही मोबदला न घेता रुग्णांची सेवा केली. त्यामुळे शासनाच्या रुग्ण कल्याण समितीने तिच्या कार्याची दखल घेऊन कोविड योद्धा म्हणून सन्मान केल्याचे कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांनी केले.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या वतीने ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार वितरण सोहळा कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे, सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा.मधुकर राळेभात, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश आजबे, अशोक धेंडे, डॉ.चंद्रकांत मोरे, नगरसेवक अमित जाधव, माजी सभापती सुभाष आव्हाड, बापुराव शिंदे आदी उपस्थित होते.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन येथील डॉ.स्नेहा सूर्यकांत मोरे यांनी बिडीएसच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असताना, डॉ.आरोळे कोविड हॉस्पिटलला सेवा देण्याचा धाडसी निर्णय घेतला. तिचे पालक सभापती राजश्री मोरे व सूर्यकांत मोरे या दाम्पत्यांनी कोविड सेंटरला काम करण्यासाठी परवानगी दिली. सूत्रसंचालन प्रा.संतोष सरसमकर यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय वाघ यांनी केले.
.............
डॉ.आरोळे हॉस्पिटलमधे डॉ.रवि व शोभा आरोळे हे कोरोना रुग्णावर मोफत उपचार करीत आहेत, असे ऐकले. यामुळे आपणही या राष्ट्रीय आपत्तीत सहभागी होऊन सेवा करावी, असे वाटले. म्हणून मी तेथे काम करण्यास सुरुवात केली. डॉ.रवि आरोळे यांनी यावेळी सेवा कशी करावी, याचे धडे दिले. मी जामखेड येथे हॉस्पिटल सुरू केल्यानंतर गोरगरीब रुग्णांसाठी मोफत सेवा करणार आहे.
-स्नेहा मोरे, मेडिकल विद्यार्थिनी
..........
१५ जामखेड मोरे
ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या वतीने कोविड योद्धा म्हणून स्नेहा मोरे यांना सन्मानित करताना प्रांताधिकारी अर्चना नष्टे.