अहमदनगर : केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाच्या निषेधार्थ भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा.किसान सभा व डाव्या पक्षांच्या वतीने शुक्रवारी शहरातील मार्केटयार्ड चौकात निदर्शने केली. नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात अॅड.कॉ.सुभाष लांडे, बन्सी सातपुते, कॉ.भारती न्यालपेल्ली, कॉ.बहिरनाथ वाकळे, अॅड.सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, तुषार सोनवणे, चंद्रकांत माळी, संतोष गायकवाड, दीपक शिरसाठ, सतीश निमसे, कार्तिक पासलकर, सतीश पवार, विजय केदारे, सुनील ठाकरे, आकाश साठे सहभागी झाले होते.
आंदोलकांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर कोरोनाचा गैरफायदा घेऊन शेतकरी, कामगार व जनविरोधी घेतलेली धोरणे रद्द करण्याची मागणी केली. यावेळी बंदोबस्तासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.