करंजी : पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चारी पाईपलाईन योजनेची फोडतोड करून पाण्याची चोरी करणा-या डोंगरवाडीचे माजी सरपंच दिलीप गिते यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनला पहिला गुन्हा दाखल केला. या पाण्यातून डोंगरवाडीचा पाझर तलाव भरुन घेतला आहे. वांबोरी चारी पाईप योजनेचे पाणी घाटसिरस, मढी, तिसगाव, शिरापूर या गावच्या तलावात पाणी गेले पाहिजे यासाठी या भागातील शेतक-यांनी अनेक आंदोलन केली. ‘लोकमत’ने याचा वेळोवेळी पाठपुरावा केला. या भागातील लोकांच्या तीव्र भावना व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून प्रशासनाने कंबर कसली. पाटबंधारे खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक परिश्रमानंतर वांबोरी चारीचे पाणी टेलच्या मढी गावाच्या तलावात पोहोचले. परंतु दोन-तीन दिवसात या भागातील काही नागरिक वॉल खोलणे, पाईपलाईन फोडून पाण्याची चोरी करीत होते. या पाणी चोरीमुळे टेलला पाणी जाण्यास अडचणी येत होत्या. मुळा पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांनी अशा पाणी चोरांविरुद्ध यंत्रणा तयार करून मोहिम राबविली. या योजनेची पहाणी करीत असताना मुळाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंता सायली पाटील व शाखा अभियंता पद्मसिंह तनपुरे यांना डोंगरवाडी तलाव या योजनेत समाविष्ट नसताना येथील एअरवॉलचे नुकसान करून तलावात पाणी घेत असल्याचे निदर्शनास आले. हे कृत्य करणा-या दिलीप कारभारी गिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापूर्वी सातवड येथे पाईपलाईनची फोडतोड करणा-या अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. वांबोरी चारी पाईपची फोडतोड करणा-याविरूध्द कठोर कारवाई करावी, लाभधारक शेतक-यांनी केली आहे. वांबोरी चारी पाईपलाईनचे पाणी टप्प्या टप्प्याने सर्वांना मिळणार आहे. परंतू योजनेचे नुकसान करून पाईपलाईन फोडून पाणी चोरी करणाविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करणार आहे, असे मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले. वांबोरी चारी पाईपलाईन फूट-तुटीमुळे दुरुस्त करणा-या यंत्रणेवर मोठा ताण पडतो. याचा परिणाम योजनेच्या पाण्यावर होत आहे. वेळ, खर्च वाढून योजना विस्कळीत होते, असे पाटबंधारेचे निरीक्षक नितीन काचुळे यांनी सांगितले.
पाणी चोरणा-या डोंगरवाडीच्या माजी सरपंचाविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 6:07 PM