अहमदनगर : नगर शहरातील प्रोफेसर चौकात रविवारी (दि़ १५) पहाटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी विनापरवाना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविला़ ही बाब निदर्शनास येताच प्रशासनाने पुतळ्याचे पावित्र्य राखत तो काढून घेत सुरक्षित ठिकाणी हलविला. या घटनेनंतर प्रोफेसर चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेचे प्रभाग अधिकारी जितेंद्र लक्ष्मण सारसर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमीत वर्मा यांच्यासह हिंदू राष्ट्र सेनेचे घनशाम बोडखे व महेश निकम, सागर ढुमणे, अनिकेत शियाळ यांच्यासह इतर आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे प्रोफेसर चौकातील पाण्याच्या कारंजाच्या पश्चिम बाजूस सिमेंटचा ओटा बांधून त्यावर शासनाची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता पुतळा बसविण्यात आला होता. ही बाब समजताच पोलीस, दंडाधिकारी यांचे प्रतिनिधी व महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी प्रोफेसर चौकात दाखल झाले़. विनापरवाना बसविण्यात आलेल्या पुतळ्याचे पावित्र्य भंग होऊ नये तसेच यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रविवारी पहाटेच पोलीस बंदोबस्तात या ठिकाणाहून पुतळा काढून घेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला. दरम्यान प्रोफेसर चौकात रविवारी दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विनापरवाना पुतळा बसविणा-या दहा जणांविरोधात गुन्हा; नगरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 1:53 PM