राहुरी : कानडगाव वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असताना अफरातफर केल्याप्रकरणी अखेर राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे माजी तालुकाध्यक्ष सोपान बबन हिरगळ यांच्याविरूध्द बुधवारी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला़ वन व्यवस्थापन समितीत भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करावी, यासाठी गेल्या तीन दिवसांपासून ग्रामस्थांचे उपोषण सुरू होते. दरम्यान, उपोषणकर्त्यांपैकी सोपान गागरे यांचा रक्तदाब वाढल्याने पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी बुधवारी रात्री दहा वाजता मध्यस्थी केल्यानंतर लिंबूपाणी देऊन गावकऱ्यांचे उपोषण सोडण्यात आले़वनपाल दत्तात्रय मेहेत्रे (रा. बेलापूर) यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. सन २००९ ते २०११ या कालावधीत जनरेटर, पाण्याचा टँकर, मळणी यंत्र व अन्य साहित्यामध्ये सोपान हिरगळ यांनी ३५३२० रूपयांचा अपहार केला़ त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी बी़ एस़जम्बे यांनी सुरूवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली़(तालुका प्रतिनिधी)
समितीच्या तत्कालीन अध्यक्षावर गुन्हा
By admin | Published: September 11, 2014 11:12 PM