शेवगाव : ठाकूर पिंपळगावातील (ता.शेवगाव) युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शेवगाव पोलीस ठाण्यात त्या युवकाचा मृतदेह आणून ठेवण्यात आला होता. याबाबत १४ जणांसह अनोळखी १० ते १५ जणांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बोधेगाव दूरक्षेत्राचे पोलीस नाईक अण्णा तुळशीराम पवार यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
ठाकूर पिंपळगाव येथील हरिभाऊ पांडुरंग बडधे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर किशोर उद्धव दहिफळे, दिलीप महादेव दहिफळे, सुनील दिलीप दहिफळे, अनिल दिलीप दहिफळे, सोमनाथ सोन्याबापू दहिफळे (सर्व रा. ठाकूर पिंपळगाव) यांच्या विरूद्ध भा. दं. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करावा यासाठी मृताच्या नातेवाईकांनी असा हट्ट धरला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी शवविच्छेदन अहवालाप्रमाणे कारवाई करू असे समजून सांगितले.
तरीही नारायण पांडुरंग बडधे, गोरक्षनाथ तुकाराम कांदे, संदीप नारायण खेडकर, पांडुरंग बडधे, पंडित कंठाळे, नितीन खेडकर, रंगनाथ कांदे, विठ्ठल खेडकर, संजय अशोक खेडकर, संदीप पोपट सोनवणे, योगेश कंठाळे, अमोल खेडकर, छोट्या बडधे, अण्णा ज्ञानदेव बडधे यांच्यासह अनोळखी १० ते १५ जणांनी हरिभाऊ पांडुरंग बडधे यांचे शवविच्छेदन झालेला मृतदेह ठाणे अंमलदारांच्या समोरील जागेत ठेवला. त्या मृतदेहाची हेळसांड करून विटंबना केली. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालून सरकारी कामात अडथळ आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे.