अनिल लगड, अहमदनगरभारत हा शेतीप्रधान देश आहे. निसर्ग बदलामुळे दुष्काळ, पूर, अतिवृष्टी ही शेतीसमोरील मोठीे आव्हाने बनली आहेत. दर दोन तीन वर्षांनी महाराष्टÑातील शेतकऱ्यांना दुष्काळासारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे आर्थिक अडचणी येऊन शेतक-यांना नैराश्य येत आहे. यातून शेतकरी आत्महत्या घडत आहेत. यात आणखी भर पडली आहे, ती वन्यप्राण्यांची. रानडुक्करे, हरीण हे प्राणी शेतक-यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. यात प्रामुख्याने शेतक-यांसमोर मोठे संकट रानडुक्करांचे आहे. या रानडुक्करांचा मोठा धसका शेतक-यांनी घेतला आहे.रानडुक्कर हा प्राणी समखुरीय गणातल्या सुइडी कुलातील सुस प्रजातीचा आहे. याचे शास्त्रीय नाव सुस स्क्रोफा आहे. हा युरोप, उत्तर आफ्रिका, आशिया, जपान, मलाया द्वीपकल्प तसेच अमेरिकेतही आढळतो. भारतात हा जवळजवळ सगळीकडे आढळतो. गवताळ किंवा विरळ झुडपे असणाºया जंगलात आणि क्वचित अरण्यात तो राहतो. पावसाळ्यानंतर पुष्कळदा यांचे कळप उभ्या पिकात शिरतात. डोक्यासकट शरीराची लांबी दीड ते दोन मीटरपर्यंत आणि खांद्यापाशी उंची सुमारे एक मीटरपर्यंत असते. रंग काळा, तपकिरी किंवा काळसर करडा असतो. पिल्ले बदामी रंगाची असून त्यांच्या अंगावर फिक्कट अथवा काळसर पट्टे असतात. मुस्कटाचे टोक चापट, मांसल तबकडीसारखे असून त्यावर नाकपुड्या असतात. वरचे आणि खालचे सुळे लांब व वाकडे होऊन तोंडाच्या बाहेर आलेले असतात. हा चपळ असून वेगाने धावू शकतो. त्याचप्रमाणे तो उत्तम पोहणाराही आहे. यांचे लहान कळप असतात. रानडुक्कर मुख्यत: शाकाहारी आहे. वनस्पतींची कोवळी खोडे, मुळे, कंद, धान्य, भुईमुगाच्या शेंगा असे पदार्थ तो खातो. पण याशिवाय किडे, सडलेले मांस व इतर घाणेरडे पदार्थ तो खात असल्यामुळे त्याला सर्वभक्षी म्हणणे योग्य होईल. पहाटे आणि संध्याकाळ या यांच्या भक्ष्य मिळविण्याच्या त्याच्या वेळा आहेत. पण पुष्कळदा ते रात्रीही बाहेर पडतात. ते पिकांची बरीच नासधूस करतात. रानडुकराचे घाणेंद्रिय अतिशय तीक्ष्ण असते. हा साहसी आणि बुद्धिमान प्राणी आहे. रानडुक्कर बहुप्रसव आहे. प्रजोत्पादनाचा ठराविक काळ नाही. सुमारे चार महिन्यांच्या गर्भावधीनंतर मादीला दर खेपेस १० ते १२ पिल्ले होतात. नेपाळ, भूतान, आसाम आणि सिक्किममध्ये हिमालयाच्या पायथ्याच्या अरण्यात एक खुजा डुक्कर आढळतो. याचे शास्त्रीय नाव सुस साल्व्हॅनियस आहे. याची उंची २५ सेंमी, पेक्षा जास्त नसते. हे रात्रीचर असून यांचे लहान कळप असतात.गेल्या तीन वर्षात महाराष्टÑात सर्वच ठिकाणी रानडुक्करांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रानडुक्करे प्रामुख्याने शेतक-यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. यात ज्वारी, भुईमूग, मूग, तूर, कापूस या पिकांशिवाय संत्रा, मोसंबी, डाळिंब बागाच्या बागा उद्ध्वस्त करीत आहेत. प्रामुख्याने ही फळपिके दुष्काळ भागातीलच आहेत. गेल्या तीन वर्षात महाराष्टÑाच्या दुष्काळी पट्ट्यात ज्वारी, भुईमूग पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. दुसरे कारण ही रानडुक्करे आहेत. ही रानडुक्करे बागायती भागातही मका, ऊस, भाजीपाल्यासारख्या पिकाचे नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. या पिकांच्या नुकसानीचे काय? असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.बीड, नगर जिल्ह्याच्या अनेक शेतक-यांशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, दुष्काळाबरोबरच रानडुक्करांची मोठी समस्या शेतक-यांसमोर उभी राहिली आहे. भविष्यात कोणतेही पीक शेतक-यांच्या पदरात पडेल अशी शक्यता राहिली नाही. यंदा ज्वारी पिके त्यांनी भुईसपाट करुन टाकले. कोवळ्यापणीच ती मोडून टाकली, असे शेतक-यांनी सांगितले.भूईमूग आणि मका ही दोन्ही पिके रानडुक्कराची आवडती पिके आहेत. ही पिके तर महाराष्टÑातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतक-यांनी या पिकांना फाटा दिला आहे, परंतु इतर पिकांचेही त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. कमी पावसामुळे व कमी पाण्यामुळे अनेक शेतक-यांनी फळबागांची लागवड केली. यात प्रामुख्याने संत्रा, मोसंबी, केळी, डाळिंब या फळांचा समावेश आहे. यासाठी शेतक-यांनी मोठा खर्च करुन महागडे ठिबक सिंचन केले. परंतु यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने रानडुक्करांना जंगलात पाणी राहिले नाही. यामुळे ही डुक्करे थेट मानवी वस्तीकडे येऊ लागली आहेत. त्यामुळे शेतक-यांनी मोठा खर्च करून फळबागांना केलेले ठिबक, तुषार संच रानडुक्करांनी उद्ध्वस्त केले आहेत.रात्रीच्या वेळी ही जनावरे ठिंबकचे ड्रिपर तोडून टाकतात. तसेच पाईपही अस्ताव्यस्त करुन चावतात. यात ठिबकचे नुकसान तर होतेच शिवाय झाडांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे ठिबक संच परत शेतक-यांना वापरात येत नाहीत. ठिबक संचाचे नुकसान केल्यानंतर या फळबागांना पाणी कसे द्यायचे? असा प्रश्न शेतक-यांपुढे निर्माण झाला आहे. एवढ्यावरच ही रानडुक्करे थांबत नाहीत तर विहिरी, बोअरवेलजवळील बांगडी पाईप व पीव्हीसी पाईपलाईन तोडून टाकण्याचे काम करीत आहेत. यामुळे शेतक-यांच्या फळबागाही जळाल्या आहेत. या रानडुक्करांचे काय करायचे? याबाबत शेतकरी हतबल आहे. शेतक-यांनी रानडुक्करांच्या बंदोबस्तासाठी अनेक उपाय केले आहेत. यातील एकाचाही उपयोग होत नाही. शेतक-यांनी पिकांसाठी व फळबागांसाठी लाखो रुपये खर्च करुन कम्पाऊंड उभारले आहे. यामुळे नुकसान कमी होत असले तरी कम्पाऊंड खोदून ही रानडुक्करे आत घुसत आहेत. शेतक-यांनी थायमीट, पळवापळवीसारख्या औषधांचा वापर केला तरी हे उपाय तात्पुरत्या स्वरुपाचे ठरत आहेत. अनेक यंत्रही यापुढे फिके पडत आहेत. कुत्र्यांना तर ही रानडुक्करे दाद देत नाहीत. उलट कुत्र्यांवर हल्ले करीत आहेत.अनेक शेतक-यांनी तारेच्या कम्पाउंडला विजेचा करंट देण्याचा प्रयत्न केला. परंतु ही रानडुक्करे एखाद्या डुकराला थोडा करंट बसला तर पुन्हा आठ, दहा दिवस फिरकत नाही. परंतु विजेच्या करंटचा प्रयोग शेतक -यांच्याच अंगलट येत आहे. त्यामुळे हा प्रयोगही फारसा उपयोगी पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.रानडुक्कर की डुक्कर संभ्रम कायमरानडुकरांमुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काही अटी आणि शर्तीच्या अधिन राहून रानडुकरांना मारण्याची परवानगी वनखात्याने दिली. आता मोकाट गावठी डुकरांमुळे सुद्धा पिकांचे नुकसान होत आहे. त्याला मारण्याची परवानगी वनखात्याने अटी आणि शर्तीविना दिल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले. रानडुक्कर महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. अगदी अल्प वनक्षेत्र असलेल्या मराठवाड्यातही. त्यामुळे राज्यात रानडुक्करांमुळे होणारे शेतीचे नुकसान सर्वाधिक आहे. एकट्या बीड जिल्ह्यात एक लाखाच्या आसपास रानडुक्करे असल्याचा अंदाज आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित यांनी रानडुकरांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. यावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी ही रानडुकरे नव्हे तर मोकाट गावठी डुकरे असल्याचे सांगितल्याने सभागृहात ‘रानडुक्कर की डुक्कर’ हा संभ्रम अखेरपर्यंत कायम राहिला.शेतीची भरपाई तुटपुंजीरानडुक्करांनी शेतपिकाचे नुकसान केल्यास हेक्टरी कमीतकमी एक हजार व जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. पण अनेक शेतक-यांना याबाबत माहिती नसल्याचे निदर्शनास आले. सध्या असलेली मदत ही नुकसानीपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. तरी सरकारने रानडुक्कर व इतर प्राण्यांनी केलेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे करावेत. यासाठी हेक्टरी दोन ते अडीच लाख मदतीची तरतूद करावी, अन्यथा येत्या काळात शेतक-यांची आर्थिकस्थिती अत्यंत अवघड होऊन शेतक-यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, अशी स्थिती निर्माण होईल. यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
शेतक-यांसमोरील संकट; रानडुक्करांचा धसका!
By अनिल लगड | Published: April 26, 2019 4:31 PM