कोतूळ गावातील दत्त मंदिर ते ब्राम्हणवाडा नाका या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून गावातील कोंडलेला श्वास मोकळा केला. व्यापारी पेठेत उलाढाल वाढली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अनेकांनी आपली दुकाने ही बोर्ड, खाटा, पाले अशी रस्त्यावरच थाटली आहेत. गावातील ब्राम्हणवाडा नाका, मुख्य चौक, हनुमान मंदिर, सेंट्रल बँक, एडीसीसी बॅंक या परिसरात काही प्रतिष्ठित व्यापारी आपली चारचाकी वाहने दिवस-रात्र पार्क करतात. गावातील अनेक नेते, युवा कार्यकर्ते आपल्या दुचाकी थेट रस्त्यावर आडव्या पार्क करून हॉटेल, दुकाने, सलून दुकानात बसून वाहतूक अडवल्याचा आनंद घेतात. मात्र आपल्या वाहनाला धक्का लागल्यास दमबाजी, हातघाई आणि अवाच्या सवा वसुली केल्याचे प्रकार सर्वश्रुत आहेत.
बेशिस्त पार्किंगमुळे भंडारदरा किंवा अन्य ठिकाणी जाणारे पर्यटक व परगावच्या नागरिकांनीही कोतूळऐवजी धामणगाव पाट, राजूर, अकोले या ठिकाणी थांबण्यास पसंती दिली आहे. कोतुळात पोलीस कर्मचारी नसल्याने कधी-कधी गावातील सुजाण नागरिकांना वाहतूक पोलिसांची भूमिका करावी लागते. तसेच ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वी बेशिस्त पार्किंगवर केलेला पाचशे रुपये दंडाचा ठराव अंमलबजावणीची वाट पाहत आहे.
......
मी ब्राम्हणवाडा परिसरात शिक्षकाची नोकरी करतो. सकाळी जाताना व दुपारी येताना अनेक वाहने रस्त्यावरच पार्क केलेली असतात. त्यामुळे आता आम्ही कोतुळात चहालाही न थांबता बायपासने जातो. बायपास रुंदीकरण केले, तर विनाअडथळा प्रवास करता येईल.
- एक प्रवासी