तिसगाव : ऑगस्ट अखेरीस अतिवृष्टी झाली. नद्या-नाल्यांच्या पुरामुळे अनेक गावे वाड्यावस्त्या पाण्याखाली गेल्या. घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली. घरात पाणी शिरल्याने हजारो कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य निकामी झाले. अतिवृष्टी पूरग्रस्तांना आता निकष बाजूला ठेवून सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे.
श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे पूरग्रस्तांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आदींना निवेदन दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजळे म्हणाल्या, वडुले येथील मुरलीधर सागडे यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना किमान २५ लाख रुपये मदत मिळावी. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. खरिपातील पिके मातीसह वाहून गेलीत. शेतकऱ्यांनाही हेक्टरी किमान २५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळावे. घरांची पडझड झाली. पत्र्याचे गोठे उडाले. पशुधन वाहून मृत्युमुखी पडले. पंचनामे करताना आजचे किमान बाजारमूल्य गृहीत धरले जावे, अशी अपेक्षाही राजळे यांनी व्यक्त केली.
सरपंच तथा कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड, विश्वस्त डॉ. विलास मढीकर, अशोक महाराज मरकड, माजी सरपंच देविदास मरकड, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, उपसरपंच रवींद्र आरोळे, वन कर्मचारी विष्णू मरकड आदींसह ग्रामस्थ हजर होते.