अहमदनगर : नगर तालुका पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकण्याची चिन्हे असून, शिवसेनेचे तालुका प्रमुख संदेश कार्ले यांच्या नावाला जवळपास सर्वच पक्षीय सदस्यांमधून पसंती मिळाल्याने कार्ले यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला तर धक्कादायक निवडीचे संकेत मिळत आहेत.नगर तालुक्यात सध्या पंचायत समितीवर शिवसेना-भाजपा युतीचे वर्चस्व आहे. आ.शिवाजी कर्डिले व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे हे युतीचे तालुक्यातील सर्वेसर्वा असल्याने हे दोघे घेतील तोच निर्णय सर्वमान्य असेल. तालुक्यात सध्या शिवसेना- ४, भाजपा- ३, काँग्रेस- ३, राष्ट्रवादी- २ असे पक्षीय बलाबल आहे. पहिल्या वेळी सभापतीपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते. हे पद सेनेच्या सुनिता नेटके यांच्याकडेच असल्याने कुठलाही विरोध न होता त्यांना सभापतीपद मिळाले. भाजपाचे शरद झोडगे उपसभापती झाले. दोन्हीही पदे राहुरी मतदारसंघात म्हणजे आ.कर्डिले यांच्या मतदारसंघात गेले. यावेळी सभापती पद ओबीसी पुरुष यासाठी राखीव आहे. शिवसेनेकडे या पदासाठी संदेश कार्ले व आश्विनी जाधव हे दोन सदस्य तर भाजपाकडे शरद झोडगे व रंजना ठोकळ हे दोन सदस्य आहेत.यात कार्ले यांनी शिवसेनेकडून सभापतीपदासाठी दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावाला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही हिरवा कंदील दाखवला आहे. विरोधी सदस्यही कार्ले यांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. तथापि विधानसभा निवडणुकीसाठी राहुरीतून आ. कर्डिले व श्रीगोंद्यातून प्रा. गाडे यांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीतील डावपेचांचा परिणाम सभापती-उपसभापतींच्या निवडीवर झाल्यास पदाधिकाऱ्यांच्या निवडी धक्कादायक ठरू शकतात. विधानसभा निवडणुकीसाठी कोण-कोणाला सोयीचा आहे याचा विचार झाला तर कार्ले यांचा पत्ता कट होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर सभापतीपद भाजपला देऊन त्या बदल्यात गाडेंना चिचोंडी व वाळकी गटातील कर्डिले समर्थकांची रसद पुरवण्याचा शब्द मिळू शकतो. हाच नियम लावला तर उपसभापतीपदासाठी पोपट निमसे इच्छूक आहेत. त्यांच्या चिचोंडी गणाचा गाडेंसाठी फायदा ठरू शकतो. असे असले तरी आ. कर्डिले व प्रा. गाडे हे जो निर्णय घेतील तो युतीच्या सातही सदस्यांना मान्य असल्याने त्याचे अधिकार या दोन नेत्यांनाच देण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)तालुक्यात गेली साडेसात वर्षांपासून सभापती पद महिलांकडेच आहे. यातील काहींच्या कार्यकाळात हाणामाऱ्या, भांडणे, वाद होऊन त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला तर काहींच्या कामकाजात पतिराजांचा नको तेवढा हस्तक्षेप झाल्याने पंचायत समितीच्या कामकाजावर त्यांचा विपरीत परिणाम झाला. यामुळे पुरुषांसाठी राखीव असलेल्या या पदावर सक्षम सदस्याची निवड करावी अशी अपेक्षा तालुक्यातील राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.सभापती- उपसभापतीच्या निवडीत युतीचे वर्चस्व राहणार असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीकडून या निवडीसंदर्भात कुठल्याच हालचाली नाही. कार्ले यांच्या नावाला पसंती असली तरी ऐनवेळी पुढे आलेल्या नावावरून निवडी बिनविरोध होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहेत. आगामी विधानसभेचे काही संदर्भ यास जोडले तर युतीत पदांची अदलाबदल होऊ शकते.
विधानसभेमुळे धक्कातंत्राचे संकेत
By admin | Published: September 13, 2014 10:31 PM