अहमदनगर : शेतक-यांना परतीच्या पावसाने दिलासा देण्याऐवजी दगा दिला आहे. सलग महिनाभर कमी-अधिक सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील १५१९ गावांतील सुमारे ४ लाख ८५ हजार शेतक-यांना फटका बसला असून ३ लाख ६४ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप, रब्बी पिके जमिनदोस्त झाली आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात ही बाब समोर आली आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५६ टक्के (७८१ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे तुडूंब भरली असून शेतक-यांच्या शेतातील पाणी पंधरा दिवसांपासून साचून आहे. त्यामुळे सर्वच खरीप व काही रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिके व फळपिकांच्या नुकसानीसंदर्भात कृषी विभागाने प्राथमिक अहवाल तयार केला असून तो जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. दुसरीकडे कृषी विभाग व महसूल विभाग प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करत आहे. पुढील आठवडाभरात प्रत्यक्ष नुकसानीचे चित्र समोर येईल. त्यानुसार शेतक-यांनी शासनाकडून भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात ५ लाख ९१ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील १ हजार ५१९ गावांतील ४ लाख ८५ हजार ४८९ शेतक-यांना फटका बसला आहे. कृषी विभागाने केलेल्या पाहणीत ३३ टक्क्यांपेक्षा अधिक व ३३ टक्केपेक्षा कमी अशी स्वतंत्र वर्गवारी केली आहे. यात ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र ३ लाख ६४ हजार १४ हेक्टर आहे. तर ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्र ३५ हजार ७८७ हेक्टर आहे. यात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ५२ हजार ५२० हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, राहाता तालुक्यांचा समावेश आहे. सर्वात कमी बाधित शेतकरी पारनेर तालुक्यात आहेत. अशी आहेत बाधीत पिके सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, गिणी गवत, ऊस, भाजीपाला, कडवळ, कांदा, केळी, भुईमूग, द्राक्षे, डाळिंब, टोमॅटो, भात आणि फळपिके यांचा बाधित पिकांमध्ये समावेश आहे.
नगर जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिके ‘जमिनदोस्त’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 2:23 PM