मच्छिंद्र देशमुख ।
कोतूळ : गोगलगाय अन् पोटात पाय... अशी म्हण गोगलगायीच्या निरूपद्रवी स्वभावाची साक्ष देते. मात्र कोतूळ शिवारात सध्या ‘जायंट स्नेल’ म्हणजे महाकाय गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. या गोगलगायी शेतातील उभी शेती उद्ध्वस्त करीत आहेत.
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात शंखाची व बिगर शंखाची अशा दोन प्रकारच्या गोगलगायी दीड ते दोन इंच लांब असतात. मात्र कोतूळात गेल्या चार वर्षांपूर्वी एका वाळुच्या ढिगातून प्रसारित झालेल्या गोगलगायी चक्क शंभर ते दोनशे ग्रॅम वजनाच्या आहेत. टेनिस बॉलच्या आकाराचे शंख असलेल्या चार, पाच इंच लांब गोगलगायी हजारोंच्या संख्येने संध्याकाळी दिवस मावळल्यावर कोतूळ-बोरी रस्ता, ब्राम्हणवाडा रोड, बसस्थानक ते कोतूळ पूल या परिसरात दिसत आहेत. या गोगलगायी निशाचर असल्याने रात्री सोयाबीन, मका, कोबी, घास, फ्लॉवर, टॉमॅटो ही कोवळी पिके फस्त करतात.
एक गोगलगाय एका रात्रीत पन्नास ते शंभर ग्रॅम वजनाचे शेतातील पिकाची पाने खातात. यामुळे घास, कोबी, सोयाबीन, मका पिके धोक्यात आली आहेत. या गोगलगायी एका वेळी दोनशे ते तीनशे अंडी घालतात. त्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात असल्याने त्या वाहने,भाजीपाला, चारा अशा विविध माध्यमातून दूरवर पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातही याचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने योग्य उपाययोजना राबविण्याचे गरज असल्याचे शेतकरी सांगतात.
मी घास, सोयाबीन व कोबी पीक वाचविण्यासाठी दररोज सकाळी, संध्याकाळी किमान एक पन्नास किलोची गोणी भरेल इतक्या गोगलगायी शेतातून गोळा करतो. परंतु दुस-या दिवशी तेवढ्याच संख्येने या गोगलगायी दिसतात. यामुळे शेतीपिके धोक्यात आली आहेत. प्रशासनाने यावर उपाय सुचवावा.
-चंद्रकांत साबळे, शेतकरी, कोतूळ.