जुबेर हॉटेलवाला, जुबेर हॉटेलमधील कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर शेख, मोहम्मद हानिफ रशीद शेख, अरबाज साजिद शेख यांसह इतर १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सलमान मुक्तार शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी संगमनेरात दाखल झाली आहे. यातील पोलीस कर्मचारी शहरात विविध ठिकाणी होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेले होते. दरम्यान दिल्ली नाका परिसरात मोठी गर्दी जमल्याने तेथे पोलीस कर्मचारी गेल्यानंतर गर्दीतील अनेकांनी मास्क घातले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच त्यांच्याकडून शारीरिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असताना पोलिसांनी त्यांना समजावून सांगत जमलेली गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जमावातील काही जण अचानक आक्रमक झाले. त्यांनी शिवीगाळ सुरू करत पोलिसांच्या निवाऱ्यासाठी ठोकलेला तंबू उखडून फेकला. हळूहळू जमाव वाढून शंभर ते दीडशे जण तेथे जमले. या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की सुरू केली. त्यावेळी नाईलाजाने पोलीस तेथून पलायन करत असताना हा जमाव पोलिसांच्या मागे धावला. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. जमावाने केलेल्या दगडफेकीत काही खासगी वाहनांचेही नुकसान झाले आहे. या घटनेने संगमनेर शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
----------------
आरोपींच्या शोधार्थ पहाटेपर्यंत सर्च ऑपरेशन
पोलिसांवर हल्ला व दगडफेक झाल्यानंतर रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी पहाटेपर्यंत सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. आराेपींच्या घरी व इतर ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. तसेच दिल्ली नाका परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. पोलीस या घटनेत सहभागी असलेल्या इतरही अनेक जणांचा शोध घेत आहेत.
------------------
समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी
पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी निषेध नोंदविला. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदने देण्यात आली. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
---------------
कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता संगमनेर शहरात गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी हे जाऊन गर्दी हटविण्याचे काम करतात. दिल्ली नाका परिसरात पोलीस गेले असता तेथे जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवत असताना जमलेला जमाव व पोलिसांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत असून लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल.
-राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर