कोरोनाच्या संकटामुळे मंदिर प्रशासनाने नियम व अटी लागू करत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता सहाऐवजी बारा हजार भाविकांची संख्या वाढविण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांची सुरक्षितता तसेच सुलभ दर्शन व्हावे यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
यंदा गर्दीत वाढ होत असली तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीची गर्दी कमी असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाच्या आदेशानंतर मंदिर भाविकांना खुले केल्यानंतर केवळ सहा हजार भाविकांनाच प्रतिदिन दर्शन दिले जात होते. मात्र, शासकीय सुट्या व सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाची सुरुवात भाविक साईदर्शनाने करत असल्याने गर्दी होणार असल्याने दर्शनमर्यादा दुपटीने वाढविण्यात आली आहे. सुमारे बारा हजार भाविकांना दर्शनाची व्यवस्था नियम व अटीचे पालन करत दिले जाणार आहे. याचे नियोजन संस्थान प्रशासनाने करत दर्शनास येण्यापूर्वी भाविकांनी मोफत व पेड दर्शनाचे पास येण्यापूर्वीच ऑनलाइन बुकिंग करूनच यावे, असे आवाहन केले आहे. भाविकांना मोफत पासची सुविधा भक्तनिवास येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांना चांगले दर्शन व्हावे, दर्शन रांगेत भाविकांची गर्दी होणार नाही यासाठी संस्थानने उपाययोजना केल्या आहेत. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, विभागाचे अधिकारी हे भाविकांना सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, गैरसोय होणार नाही यासाठी उपाययोजना करत आहेत. पोलीस प्रशासनाने सुरक्षा व वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे.