केडगाव : केडगावमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. लसीकरणासाठी शनिवारी केडगाव येथील केंद्रात लोकांची अक्षरश झुंबड उडाली होती. दुसरीकडे तपासणीसाठी लोकांच्या उन्हातान्हात लांबलचक रांगा लागल्या होत्या.
केडगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ७० ते ८० जणांची रोजची भर पडत आहे. आतापर्यंत बाधित रुग्णांचा आकडा चार हजारांच्या घरात गेला आहे. सध्या केडगावमध्ये ४००पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय आहेत. केडगाव परिसरातील सर्व खासगी रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. रुग्णांना उपचार मिळवण्यासाठी रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बसून दोन - तीन दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. केडगावमध्ये कोविड सेंटर नसल्याने गोरगरीब रूग्णांना खासगी रुग्णालयांचे लाखो रूपयांचे उपचार परवडत नाहीत. एकूणच केडगावची स्थिती गंभीर होत चालली आहे. शनिवारी विकेंड लॉकडाऊन होते. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. नगर - पुणे रस्ताही निर्मनुष्य झाला होता. केडगावमधील कोरोना स्थितीमुळे मनपाच्या केडगाव आरोग्य केंद्रात लसीसाठी लोकांची सकाळपासूनच झुंबड उडाली होती. उन्हातान्हाची पर्वा न करता लोक तासनतास रांगेत उभे राहून लस कधी मिळेल, याची प्रतीक्षा करत होते. शेजारीच कोरोना तपासणीचा मंडप थाटण्यात आला आहे. तेथेही तपासणीसाठी मोठी गर्दी उसळली होती. उन्हाचा वाढता तडाखा आणि रोज माराव्या लागणाऱ्या चकरा पाहून कोरोनाच्या आधी उन्हानेच मरण्याची वेळ आली आहे, अशी भावना केडगाव येथील मनोज बोरा यांनी व्यक्त केली.
एकीकडे केडगावमधील कोरोना परिस्थिती गंभीर रूप धारण करत आहे. त्यात कमी मनुष्यबळ, कमी भौतिक साधने असूनही केडगाव केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष दळवी या लढाईला प्रशासनाकडून एकटे तोंड देत आहेत.
.........
लसीचा तुटवडा आणि लोकांचा हेलपाटा
केडगावमध्ये रोज सरासरी शंभर जणांना लस देण्यात येते. लस घेण्यासाठी मात्र सकाळपासूनच ७०० ते ८०० लोकांची गर्दी उसळते. लसीचा तुटवडा असल्याने रोज ५०० ते ६०० लोक परत जातात. अनेकांना पाच - पाच दिवस हेलपाटे मारूनही लस मिळत नाही.
.............
केडगावमध्ये लसीकरण केंद्र व कोरोना तपासणी केंद्र शेजारीच आहे. त्यात जास्त अंतर असावे. रोज उन्हात थांबूनही लस न घेताच घरी जावे लागते. त्यामुळे टोकन पद्धत सुरू करावी.
- बाळासाहेब रणसिंग, बाळासाहेब शेळके
.............
१० केडगाव