कोपरगाव : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तृणधान्य रब्बी ज्वारी पिकाचा शेतकरी शेती दिन कार्यक्रम कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील आनंदवाडी येथे सोनवणे वस्तीवर नुकताच घेण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रब्बी ज्वारी पिकाचे अर्थशास्त्र, पिकाचे आरोग्य दृष्टिकोनातून आहारातील महत्त्व, त्याचबरोबर ज्वारी पिकांपासून तयार करण्यात येणारे लाह्या, हुरडा, पापडसारखे प्रक्रियायुक्त पदार्थ, कांदा पिकाचे कीड-रोग सर्वेक्षण खत व पाणी व्यवस्थापन आदी तंत्रज्ञान याबाबत शेती शाळा प्रशिक्षक निलेश बिबवे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी माधुरी गावडे, कृषी सहाय्यक दिनकर कोल्हे, शेती शाळा प्रशिक्षक निलेश बिबवे, काकडीचे माजी सरपंच अनिल सोनवणे, प्रगतशील शेतकरी पावलस सोनवणे, नितीन सोनवणे, प्रकाश सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह प्रकल्पातील ज्वारी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.