विनोद गोळेपारनेर : कुकडी प्रकल्पात पाणी साठा कमी उपलब्ध होत आहे. कुकडी प्रकल्पात धरणे एकमेकांना जोडण्यासाठी बोगद्यातून पाणी दुसऱ्या धरणात सोडण्याचा विचार सुरू आहे. कुकडी, पिंपळगाव जोगाचे पाणी पारनेर तालुक्यातील गावासह सर्वांना समान मिळावे यासाठी नियोजन करणार असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त शिवतारे पारनेर येथे आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. पिंपळगाव जोगाचे पाणी पुणे जिल्ह्यातील लोक पळवतात. आवर्तन पारनेर तालुक्यातील गावांसाठी असूनही पाणी मिळत नसल्याचा प्रश्न विचारल्यावर शिवतारे म्हणाले, पिंपळगाव जोगाचे आवर्तन सुटल्यावर विधानसभा उपाध्यक्ष आमदार विजय औटी यांनी याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. त्यानंतर आम्ही एकत्रित बसून पिंपळगाव जोगाचे पाणी पारनेर तालुक्यात येण्यासाठी जुन्नर तालुक्यात पोलीस बंदोबस्त कालव्याच्या ठिकाणी ठेऊन वेळप्रसंगी गुन्हेही नोंदविले आहेत, असे शिवतारे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा शिवसेनेने सत्तेत असताना केलेल्या विकासकामांचा विश्वास जनतेत निर्माण करून आशीर्वाद घेण्यासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले.चारी वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईपारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध कुंड, रांजणखळगे जवळील सुलाखेवाडी व परिसरातील शेतकºयांना चारीमधून पाणी मिळत नाही. याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यात काही खासगी लोक चारीवर अतिक्रमण करून पाणी उपसा करीत आहेत ही गंभीर बाब आहे. या प्रश्नावर पारनेरचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या उपस्थितीत जलसंपदाचे अधिकारी, अभियंता यांची बैठक होऊन कारवाई करतील, असे शिवतारे यांनी सांगितले.
कुकडी, पिंपळगाव जोगाच्या पाण्याचे नियोजन करणार :विजय शिवतारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:06 PM