शिर्डी पोलीस स्थानक व शिर्डी नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने साई मंदिरलगत भाविकांच्या सेवेसाठी उभारलेल्या पोलीस मदत केंद्राची पाहणी विशेष पोलील महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांनी केली.
नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, गटनेते अशोक गोंदकर, नगरसेवक सुजित गोंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, प्रवीण लोखंडे, दीपक गंधाले उपस्थित होते.
दिघावकर म्हणाले, शिर्डीत उभारलेल्या पर्यटन पोलीस मदत केंद्रामुळे पोलिसांच्या चांगल्या कामाचा प्रसार भाविकांच्या माध्यमातून संपूर्ण जगात पोहोचणार आहे. हे मदत केंद्र केवळ पोलिसांचे नव्हे; तर महाराष्ट्र पोलिसांचा चेहरा राहणार आहे. या ठिकाणी भाविकांची सुरक्षा व्हावी, यासाठी विशेष काम करणे गरजेचे आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी गुन्हेगारी, भाविकांची सुरक्षितता याबाबत दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या. शिर्डीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करणार आहे. पोलीस दलाने भाविकांची सुरक्षितता राखण्यासाठी प्राधान्य देऊन काम करावे. महामार्ग पोलिसांकडून भाविकांची अडवणूक होणार नाही. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर म्हणाले, पर्यटन पोलीस मदत केंद्रामुळे भाविकांची सुरक्षितता होण्यास मदत होईल. मंदिर परिसरात होणारी पाकीटमारी, दागिने, पर्स चोरी घटनांना आळा बसेल. भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पोलीस मदत केंद्र असल्याने शिर्डी नगरपंचायतीच्या सभागृहाने या केंद्राच्या उभारणी ठरावास सर्वानुमते मान्यता देऊन सहकार्य केल्याचे गोंदकर यांनी सांगितले.
नगरसेवक सुजित गोंदकर यांनी या मदत केंद्राच्या उभारणीसंदर्भात समाधान व्यक्त करत शिर्डीतील पोलिसांची चांगली कामगिरी तसेच महामार्ग पोलिसांकडून भाविकांची होणारी अडवणूक याबाबत दिघावरकर यांचे लक्ष वेधले. गटनेते अशोक गोंदकर यांनी आभार मानले.
१८दिघावकर