अहमदनगर : जिल्ह्यातील सरपंचपदासाठी २७ आणि २८ तारखेला तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही आरक्षण सोडत प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आरक्षण काढताना १९९५ पासूनचे रोटेशन तपासले जाणार आहे. त्यामुळे नेमका कोण सरपंच होणार याची उत्सुकता ताणली आहे.
जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ९ ग्रामपंचायतींमध्ये काही जागा बिनविरोध, तर काही जागा रिक्त आहेत. त्यामुळे ७०५ ग्रामपंचायतींच्या ५,७८८ जागांसाठी मतदान झाले. १५ जानेवारीला मतदान झाले आणि १८ जानेवारीला निकाल लागला. त्यामुळे निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात यावी, असा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र, निवडून आलेल्या सर्वच सदस्यांनी आपापल्या नेत्यांकडे, राजकीय पक्षांकडे आरक्षण सोडतीसाठी आग्रह धरला आहे. नेत्यांनी ही बाब ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कानावर घातली. त्यानंतर मुश्रीफ यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आठ दिवसात सरपंच आरक्षण सोडत काढावी, अशा सूचना दिल्या. मात्र, लेखी आदेश नसल्याने जिल्हा प्रशासनाचे नियोजन अद्याप सुरू आहे. जिल्हा प्रशासनातील ग्रामपंचायत शाखेने २७ आणि २८ तारखेला आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम तयार केला आहे. तो मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. त्यांची मान्यता मिळताच तो कार्यक्रम जाहीर होणार आहे.
----------
तहसील कार्यालयात होणार सोडत
संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदारांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात ही सोडत काढण्यात येणार आहे. संबंधित गावातील १९९५पासूनचे सरपंचपदाचे आरक्षण ग्राह्य धरले जाणार आहे. त्यासाठी सर्व तहसीलदारांनी १९९५ पासूनची माहिती संकलित केली आहे. त्यामुळे त्या पंचवार्षिकपासून रोटेशनपद्धतीनुसार आरक्षण कार्यक्रम तयार करण्यात प्रांताधिकारी आणि तहसीलदार व्यस्त आहेत. आरक्षण सोडतीबाबतची सर्व भीस्त तहसीदारांवरच राहणार आहे.
--------------
...तर ‘तो’ सदस्यही होऊ शकतो सरपंच
एका ग्रामपंचायतीमध्ये ७ जागा आहेत. एका गटाला ४ जागा आणि दुसऱ्या गटाला ३ जागा मिळालेल्या असतील तर ३ सदस्य निवडून आलेल्या गटातील सदस्यही सरपंच होऊ शकतो. सोडत निघालेल्या कॉटेगिरीचा सदस्य नसला तर बहुमत असलेल्या गटाला सत्ता मिळणार नाही. बहुमत कोणाला मिळाले हे पाहून आरक्षण सोडत काढली जात नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
---------
फाईल फोटो- २१ सरपंच