अहमदनगर - शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले असून भानुदास कोतकर आणि बाळासाहेब कोतकर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्येप्रकरणी दुहेरी हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अन्य ३० जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी सहा वाजता केडगाव येथील सुवर्भण नगर येथे भर चौकात संजय कोतकर व वसंत ठुबे यांना ठार मारण्यात आले. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली. संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी हल्लेखोरानी रिव्हॉलव्हरमधून गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. संतप्त जमावाने परिसरातील वाहनांवर जोरदार दगडफेकीला सुरूवात केली. यावेळी स्थानिक व्यवसायिकांनी व रहिवाशांनी घरे व दुकाने बंद करून घेतली. त्यानंतर नगर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, माजी महापौर संदीप कोतकर, भानुदास कोतकर यांच्या सांगण्यावरुन विशाल कोतकर, औदूंबर कोतकर, बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ, रवी खोलम, अशोक कराळे, नवनाथ कराळे, मोहसीन शेख, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, संदीप गिर्हे, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गंगड, अप्पा दिघे, बाबूराव कराळे यांच्यासह पाच ते सहा जणांनी कट, कारस्थान करून संजय कोतकर व वसंत ठुबे यांना गोळ्या घालून व कोयता तलवारीने मारल्याचे या फिर्यादित म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी ३० जणांसह इतर ५ ते ६ जनांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.